पालकमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळावा ही वेळ येऊ देणार नाही
नगर – पक्ष संघटना वाढीबरोबरच शासनस्तरावरील विविध समित्यांचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी राष्ट्रवादी भवन या पक्षाच्या कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच कार्यकर्त्यांच्या बैठकीला पक्षाच्या आमदारांनी पाठ फिरविली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व आमदार संग्राम जगताप वगळता उर्वरित पाचही आमदारांनी दांडी मारली.
यावेळी ना. मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळावा, ही वेळ येवू देणार नाही. संघटना वाढीबरोबरच कार्यकर्त्यांची कामे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री झाल्यानंतर ना. मुश्रीफ नगर जिल्ह्यात दोनवेळा आले होते. त्यावरून त्यांच्यावर टिका सुरू झाली होती. आज ते तिसऱ्यांदा नगर जिल्ह्यात आले.
सत्तेमध्ये नगर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा
विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील 12 पैकी 9 जागा जिंकल्याने महाविकास आघाडीचे सरकार येण्यास नगर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असल्याचे ना. मुश्रीफ म्हणाले.
पक्षाकडे पवार हेच भांडवल
राष्ट्रवादीकडे शरद पवार हेच मोठे भांडवल आहे. त्यांच्यामुळे आज पक्षाला सत्ता मिळाली आहे. वय 80 असले तरी ते संपर्क व संवादात कोठेही कमी नाही. पक्षावर अनेक संकटे आली पण पवार या भांडवलामुळे पक्ष पुन्हा उभा राहिला आहे, असे ना. मुश्रीफ म्हणाले.