पाचगणी : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मेढा येथे ऑक्सिजन प्लांट उभारणार असून जुन्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसह कोविड सेंटर ते सुसज्ज करणार आहेत.
जावळी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. कोविड सेंटर असूनदेखील ऑक्सिजन कमतरतेमुळे रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ होत आहे. सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळीतील तालुका ठिकाण असलेल्या मेढा शहरात आमदार निधीतून सुसज्ज ऑक्सिजन प्लांट उभारण्याबाबत त्यांनी मेढा ग्रामीण रुग्णालयात अधिकारी वर्गाशी सविस्तर चर्चा केली. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जावळीकरीता यापूर्वी ग्रामीण रुग्णालयाला एक्स रे मशीन दिले आहे.
कुडाळ, सोमर्डी, बामणोली या मुख्य गावांसाठी मेढा येथे हा प्लांट उभारण्यात येणार आहे.
मेढा नगरपंचायतच्या जुन्या छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्याकरीता आ. शिवेंद्रराजे प्रयत्नशील आहेत.
यावेळी प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तहसीलदार पोळ, तालुका आरोग्य अधिकारी भगवान मोहिते, नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्ष कल्पना जवळ, माजी नगराध्यक्ष अनिल शिंदे आदी उपस्थित होते.