पाचगणी(सादिक सय्यद, प्रतिनिधी) :- राज्याच्या मंत्रिमंडळात छत्रपतींचे वारस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा समावेश होणार का? याबाबत जिल्ह्यात मोठी उत्सुकता आहे. भाजपने शिवेद्रसिंहराजे यांना मंत्रिमंडळत स्थान देऊन छत्रपतींच्या वारसाचा बहुमान करावा, अशी अपेक्षा जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर हिंदुत्वाचा नारा देऊन एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस किंगमेकर ठरले. सत्तेमध्ये बदल झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बलस्थान असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला खिंडार पाडायच काम देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आ. शिवेंद्ररांजे यांना भाजपमध्ये घेऊन निश्चित केले आहे. मात्र, त्यावेळी दुर्दैवाने फडणवीस यांचा सत्ता आणण्याचा प्रयत्न अयशस्वी करण्यात शरद पवार यांना संधी मिळाली.
राज्यात शिंदे- भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे या सरकारला छत्रपतींच्या घराण्यातील आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिपदाची माळ घालून छत्रपतींच्या वारसाचा बहुमान करण्याची नामी संधी चालून आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपकडून आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा बहुमान करणार का? याबाबत राज्यात उत्सुकता आहे.
खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले दोघांनाही भाजपमध्ये घेतल्याने छत्रपतींच्या वारसांची बहुमोल साथ घेत सर्वसामान्यांमध्ये भाजपने हिंदुत्वाची छबी आणखीनच गडद केली. भाजपने योग्य योग जुळवले आणि सत्तेच चक्र जुळवण्यात फडणवीस यांना यश आले आहे. मात्र, आ. शिवेंद्रसिंहराजे यांना भाजपकडून मिळणारे मंत्रिपद भाजपला पश्चिम महाराष्ट्रातील घोडदौडीला सोयीस्कर ठरणार आहे. शिंवेद्रराजेंनी वेळोवेळी आ. शशिकांत शिंदे यांची घोडदौड रोखण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे.
राष्ट्रवादीचे सुप्रिमो यांचे निष्ठावंत शशिकांत शिंदे यांच्या जिल्हा बॅकेच्या पराभवाचे शल्य म्हणून शरद पवार यांनी शिवेंद्रराजेंना अध्यक्षपदाची धुरा नाकारण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळींच्या जिव्हारी लागला आहे. शिवेंद्रराजेना मंत्रिपद मिळाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार पाडून मोठा राजकीय भूकंपदेखील होऊ शकतो. भाजपची ताकद पश्चिम महाराष्ट्रात वाढवत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसला शह देण्याचे काम शिवेंद्रराजे भोसले यांच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस योग्य रितीने करु शकतात. महाराष्ट्राच्या सत्तेच्या सारीपाटावर छत्रपतींच्या घराण्यातील आमदार शिवेद्रराजे भोसले यांना मंत्रिपदाची ताकद देऊन भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेसची घोडदौड थांबवण्यात कितपत यशस्वी होईल, हे मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवेंद्रसिंहराजे यांच्या मंत्रिपदाच्या वर्णीवरुनच निश्चित होणार आहे.