मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना प्राचार्याला मारहाण करणे चांगलेच महागात पडल्याचे पाहायला मिळत आहे. कारण प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार बांगर यांच्यावर हिंगोली ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर महाविद्यालयातील पाच अधिकाऱ्यांसह इतर 30 ते 40 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण झाल्यानंतर तब्बल 10 दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसापूर्वी प्राचार्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अखेर 10 दिवसानंतर संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्याला मारहाण करणे बांगर यांना चांगलच भोवले आहे. त्या ठिकाणी आमदार बांगर यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची सुद्धा तोडफोड केली होती. त्यामध्ये पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सतत वादात अडकणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केली होती. आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत होते.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर खुद्द आमदार बांगर यांनी खुलासा केला होता. मारहाण करण्यात आलेल्या प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला होता. त्यामुळे माहिलेवर अत्याचार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी त्याची पर्वा नसल्याचे संतोष बांगर यांनी म्हटले होते.