नगर (प्रतिनिधी) – समाजाला दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचे समाजामध्ये सर्वोच्च स्थान आहे. शिक्षकांनी घडवलं म्हणूनच आम्ही घडलो. त्यामुळे नगर शहरात शिक्षक भवनासाठी महापालिके मार्फत शिक्षक संघाला जागा देण्यासाठी प्रयत्न करु. शिक्षक संघटनेने देखील त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी आज मांडली.
नगर तालुका शिक्षक संघ व तालुका गुरुमाऊली मंडळातर्फे तालुक्यामधील विविध क्षेत्रांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच पदोन्नती मिळालेल्या विस्ताराधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विविध परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या यशवंतांचा सत्कार येथील सरस्वती मंगल कार्यालयात आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी शिक्षक बॅंकेचे ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण होते.
प्रमुख पाहुणे म्हणून गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे, नगरसेवक सुवर्णा जाधव, शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन साहेबराव आनाप, शरद सुद्रिक, संतोष दुसुंगे आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार जगताप यांनी गुरुमाऊली मंडळाच्या आणि शिक्षक बॅंकेच्या प्रगतीचे कौतुक केले. शिक्षकाना आर्थिक दृष्ट्या संपन्न करण्याचे काम शिक्षक बॅंकेने केले आहे. बॅंकेमार्फत शिक्षकांना केली जाणारी मदत आजच्या काळात प्रशंसनीय आहे, असे ते म्हणाले.
जिल्हा संघाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी भूमिका मांडली. शिक्षक संघाला नगर शहरात शिक्षक भवनासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तांबे यांनी यावेळी केली. माजी चेअरमन साहेबराव अनाप, सलीमखान पठाण, बॅंकेचे चेअरमन राजू राहणे, राजकुमार साळवे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक तालुका संघाचे अध्यक्ष महेश भणभणे व नारायण पिसे यांनी केले. सूत्रसंचालन सुजाता पुरी व रेवनाथ पवार यांनी केले. सातपुते यांनी आभार मानले.