वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली मध्ये अनेक नागरिक हे व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागातून आले आहेत. वाघोली मधील नागरिक हे इतरांशी समंजस पणाने वागतात आणि त्यांच्या पाठीशी उभी राहतात ही त्यांची सवय अभिमानास्पद आहे. याशिवाय या वाघोली मधील नागरिकांमध्ये जो संयम आहे तो संयम कौतुकास्पद असून याच मुळे सामान्य नागरिक किंवा या भागातील प्रतिष्ठित लोक हे राजकारणाच्या पलीकडच्या मैत्रीस पात्र असून हे मैत्रीचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जात असल्याचे प्रतिपादन पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केले.
वाघोली मध्ये व्यवसायाच्या निमित्ताने पारनेर मतदार संघातील वास्तव्यास असलेल्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी लंके आले होते. वाघोली ग्रामस्थांच्यावतीने माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच शांताराम कटके, पंचायत समिती हवेली चे उपसभापती नारायण आव्हाळे, वाघोली, आव्हाळवाडी, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
राजेंद्र सातव पाटील, शांताराम कटके यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा तसेच वाघोली मधील नागरिकांची पारनेर मतदारसंघातील नागरिकांना होत असलेल्या मदतीबाबत आमदार लंके यांनी प्रशंसा केली. हवेली पंचायत समिती हवेली च्या उपसभापती नारायण आव्हाळे यांच्या निवडीबद्दल आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.