पुणेः पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वाढणार असून त्यामुळे पाण्याची समस्या भेडसवणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. याचाअहवाल अधिकाऱ्यांच्या समितीने दिला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. चिखली येथील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन, पुणे पोलीस अधीक्षक कार्यालय भूमिपूजन आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू शकते. तसेच शेती उद्योगांना पाणी दिले जाते. यामुळे दुबईप्रमाणे खारे पाणी पिण्यायोग्य करावे लागण्याची स्थिती येऊ शकते. लकरच रिंग रोडच्या कामाला सुरुवात होणार असून सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम होत नाही, तोपर्यंत वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नसल्याचे भाष्य अजित पवार यांनी यावेळी केले.
१९९२ ते २०१७ या कालावधीत शहराचा विकास केला.
या कार्यक्रमात पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या मुद्यांवर श्रेयवाद झाल्याचे पाहिला मिळाला. भरसभेत अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना आपण महायुतीमध्ये आहोत ज्याने चांगलं काम केले आहे त्याला चांगले म्हणायचे शिका. एवढा कंजूषपणा दाखवू नका, असा टोला लगावला. तसेच पुढे अजित पवार म्हणाले, “शहराचा कायापालट कोणी केला, हे पिंपरी-चिंचवडकरांना माहिती आहे. मी १९९२ ला पिंपरी-चिंचवडचा खासदार झालो. १९९२ ते २०१७ या कालावधीत शहराचा विकास केला. २५ वर्ष झाली, शहरातील प्रत्येक गोष्ट मी लक्ष देऊन काम करत आहे.”
तूर्तास नवीन जिल्हा नाही
याच सभेच्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी शहरात वाढत असलेली लोकसंख्या यामुळे पिंपरी चिंचवड नवीन जिल्हा घोषित करण्याची मागणी केली. यावर अजित पवारांनी एकही नवीन जिल्हा जाहीर केला जाणार नसल्याचे म्हटले. तसेच ज्यावेळेस वाटेल त्यावेळस सरकार निर्णय घेईल, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.
…अन्यथा मकोका अंतर्गत कारवाई करावी.
पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. कोयत्ता गँग दहशत पसरवण्याचे काम करत आहे. यावरही अजित पवारांनी भाष्य केले. ५ फेब्रुवारीला बिबवेवाडीत २५ तर सहा फेब्रुवारीला येरवड्यात १५ वाहनांची तोडफोड झाली. अशा आरोपींची धिंड काढावी, कोण मोठ्या आणि छोट्या बापाचा नाही, कायदा हा सर्वात श्रेष्ठ आहे. कोणता आणि कोणती गँग काढली जाते त्याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी, असे आवाहन अजित पवारांनी पोलिसांना केले.