मी कायम कामगारांच्या ऋणात राहीन : आमदार लांडगे

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराला नावारूपाला आणण्यास कामगारांचा मोठा हातभार आहे. माझ्या राजकीय वाटचालीत कामगारांनी सुरुवातीपासून मला साथ दिली. मी ही त्यांच्या कायम ऋणात राहीन. मी कामगाराचा मुलगा आहे, माझ बालपण आणि माध्यमिक शिक्षण कामगार कॉलनीमध्ये झाले. यामुळे कामगारांच्या समस्यांची मला जाणीव आहे. मी कायम कामगारांसोबतच आहे, असे उद्‌गार आमदार महेश लांडगे यांनी येथे काढले.

भोसरी येथे झालेल्या विविध कामगार संघटनांच्या मेळाव्यात कामगारांशी संवाद साधताना आमदार लांडगे बोलत होते. पिंपरी, चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योगिक पट्ट्यातील अंतर्गत आणि बाह्य कामगार संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या सर्व युनियनच्या अध्यक्षांनी आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी महापौर राहुल जाधव, टाटा मोटर्स कामगार युनियनचे माजी अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, प्रकाश मुगडे, हनुमंत लांडगे, जीवन येळवंडे, रोहिदास गाडे, संतोष बेंद्रे, किसान बावकर, शाम सुळके, काशिनाथ नखाते, मच्छिंद्र दरवडे, श्रीयुत दरेकर, श्रीयुत गोरे, सचिन लांडगे यांच्यासह अनेक कामगार नेते उपस्थित होते. कामगार संघटनेकडून एक लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आमदार महेश लांडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

आमदार लांडगे पुढे म्हणाले की, माझ्या राजकीय प्रवासात कामगारांनी सुरुवातीपासून मला साथ दिली. वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच कामगारांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला. तेव्हा कामगारांनी मोठ्या कष्टाने शहरात गुंठा-अर्धा गुंठा जागा घेऊन घरे बांधली. यातील अनेक घरे अनधिकृतही आहेत. या बांधकामांच्या विरोधात कारवाई सुरू झाली तेव्हा गोरगरीब कामगारांची ही घरे नियमित व्हावीत, यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा केला. कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या कामगार नेत्यांची नावे उड्डाणपूल, चौक, रस्त्यांना दिली असल्याची आठवणही आमदार लांडगे यांनी करून दिली.

संतोष बेंद्रे म्हणाले, अनेक कंपन्या कामगारांना कमीपणाची वागणूक देतात. कामगारांना अचानक कामावरून काढले जाते. तसेच अनेक वर्षांपासून कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना अजूनही किमान वेतन मिळत नाही. कंपन्यांमधील कामगारांना आधाराची गरज आहे. त्यासाठी आमदार लांडगे यांचेच सक्षम नेतृत्व हवे आहे.
जीवन येळवंडे म्हणाले, कामगारांसाठी विकासाची दारे आमदार लांडगे यांनी खुली केली. कामगारांना चांगले राहणीमान जगता यावे यासाठी आमदार लांडगे सातत्याने प्रयत्नशील आहेत. ज्या कामगारांची घरे रस्त्यात गेली, त्या बाधित कामगारांना आमदार लांडगे यांनी घरे मिळवून दिली. कामगार हिताची काळजी घेणारा असाच नेता कामगारांना आमदार म्हणून हवा आहे.

विष्णुपंत नेवाळे म्हणाले, आमदार महेश लांडगे यांनी अनेक कुरघोड्यांवर मात करत कामगारांच्या प्रश्‍नांसाठी पाठपुरावा केला आहे. कामगारनगरीत कामगारांचे जटील झालेले प्रश्‍न सोडविण्यासाठी भविष्यातही निश्‍चित प्रयत्न करतील, असा विश्‍वास नेवाळे यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.