पिंपरी – राज्यात सत्ता बदलल्यानंतर पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षपदाची सूत्रे कुणाकडे येणार याबाबत चर्चा सुरू होती. पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदासाठी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शहर भाजपाची गुरूवारी आकुर्डी येथे बैठक पार पडली. या बैठकीत आमदार महेश लांडगे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. या वेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विनोद तावडे, खासदार अमर साबळे, मावळते शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, सदाशिव खाडे, उमा खापरे, सचिन पटवर्धन, अमित गोरखे तसेच आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे हे भोसरी मतदार संघातून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लांडगे यांनी भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यांनी या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांने विजय मिळविला आहे. आता भाजपा शहराध्यक्षपदाची सूत्रे त्यांची हाती सोपविण्यात आली आहेत.
लक्ष्मण जगताप यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पदाधिकार्यांसह, शहराध्यक्षांची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात येते. हा पक्ष कोणा एका व्यक्तीची नाही. त्यामुळे सर्वांना चांगले काम करण्याची संधी दिली जाते. मावळते शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केले. तसेच काम महेश लांडगे करतील. शहराचा जास्तीत जास्त चांगला विकास कसा करता येईल याच्यावर पक्ष काम करेल.
पालिकेत सत्ता येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते
पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता येईल असे स्वप्नातही आम्हाला वाटले नव्हते. मात्र शहराध्यक्ष आमदार जगताप म्हणाले होते की, आम्ही शंभरपेक्षा जास्त नगरसेवक शहरात निवडून आणू. त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करत शहरात 73 नगरसेवक भाजपाचे निवडून आणले. त्यामुळे महापालिकेत भाजपाची सत्ता आली. मागच्या अडीच वर्षामध्ये भाजपाने शहरात चांगल्या पद्धतीने काम केले आहे. यापुढेही शहराचा विकास अजून गतीमान करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष ते भाजप शहराध्यक्ष
आमदार महेश लांडगे यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी सेलमधून आपला राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. महापालिकेमध्ये स्थायी समिती सभापती पदावरही त्यांची निवड झाली होती. 2014 मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. विधानसभेला निवडून आल्यावर ते भाजपाचे सहयोगी आमदार राहिले. त्यानंतर आता दुसर्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्यावर भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यामध्ये भाजप हा विरोधात असल्याने शहरात शहराध्यक्ष म्हणून त्यांना संघर्ष करावा लागणार आहे.