नरेंद्र मोदींकडून देशाच्या घटनेला धोका – जयंत पाटील

पिंपरी – नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या घटनेला धोकया निर्माण झाला आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली घटनाच या लोकांनी बदलण्याची तयारी चालविली असून घटना कुमकुवत करणाऱ्यांपासून देशाला धोका असल्याचे सांगत नरेंद्र मोदी आणि सरकारवर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी हल्ला चढविला.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शनिवारी थेरगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी पाटील यांनी मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामकाजाच्या पद्धतीवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या केंद्र सरकारच्या कार्य पध्दतीला कंटाळून पाच वर्षांत भारतीय रिजर्व्ह बॅंकेच्या गर्व्हनरांनी राजीनामे दिले. भारत स्वतंत्र झाल्यापासून प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी माध्यमांसमोर येऊन नाराजी व्यक्त केली. एका रात्रीत निर्णय घेऊन देशभरातील जनतेवर नोटाबंदी लादली. त्यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था ठप्प झाली आहे. नोटाबंदी नंतर आरबीआयच्या गर्व्हनरांना प्रथमच केंद्रीय लोक लेखा समिती समोर हजर राहून जबाब देण्याची नामुष्की आली. मोदी सरकार केंद्रीय संस्थांचे संवैधानिक महत्व कमी करीत असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.

पत्रकार परिषदेला यावेळी शेकापचे शहराध्यक्ष नितीन बनसोडे, कार्याध्यक्ष हरीष मोरे, माजी नगरसेवक सतिश दरेकर, उन्मेश पाटील, राहुल पोकळे उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.