वडगावशेरी – वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांनी येरवडा येथील पर्णकुटी चौकात जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी या भागातील कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच युवकांसह महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मुळीक यांनी गेल्या पाच वर्षांतील कामांचा आढावा सादर करत या वेळीही विकासला साथ देण्याचे भावनिक आवाहन मतदरांना केले.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक बापुसाहेब कर्णे गुरूची, अनिल टिंगरे, ऍड अविनाश साळवे, संदीप जऱ्हाड, राहुल भंडारे, मारुती सांगळे, शीतल सावंत, फरजाना शेख, मुक्ता जगताप, ऐश्वर्या जाधव, सुनीता गलांडे, शीतल शिंदे, श्वेता चव्हाण, श्वेता खोसे गलांडे, शिवसेनेचे आनंद गोयल, संतोष राजगुरू यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर येरवडा गावठाणात मुळीक यांनी प्रचारयात्रा काढली.
मतदारांना भावनिक साद
प्रचाराचा नारळ फोडताना, मुळीक यांनी मतदारांना भावनिक साद घातली. तसेच येरवडा गावठाणात काढलेल्या प्रचार फेरीत त्यांनी ज्येष्ठ नागरिक तसेच युवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारांना आपल्या पाच वर्षांच्या कामाचा लेखा जोखा मुळीक यांनी सादर केला. त्यात महाराष्ट्रातील पहिला बंदिस्त फुटपाथ केला. सेवन डी थिएटर, पाम उद्यान आणि दोनशे पेक्षा जास्त ओपन जीम केले आहेत.
मतदारसंघातील 11 हजार कुटुंबांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा, लोहगाव मध्ये शंभर खाटांचे रुग्णालय, लोहगाव विमानतळीच विस्तारिकरणाचे काम, येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयामध्ये डायलिसिस सुविधा केंद्र, तारकेश्वर देवस्थानला क दर्जाचे पर्यटनस्थळाचा मिळवून दिलेला दर्जा अशा कामांची माहिती देत मतदारांना या निवडणुकीत मतदारसंघात झालेला विकास पाहता आपल्याला पुन्हा संधी द्यावी, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.