सातारा/वडूज – मायणी (ता. खटाव) येथे मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले आमदार जयकुमार गोरे यांना उच्च न्यायालयाने 9 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले असून 9 रोजी पुन्हा अंतिम सुनावणी होणार आहे. मात्र, या गुन्ह्यात जरी अटकेपासून संरक्षण मिळाले असले तरी त्यांच्यावर दाखल असलेल्या दुसर्या गुन्ह्यात अटकेची शक्यता असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.
याबाबत माहिती अशी, मायणी येथील भिसे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला असतानाही, ते जिवंत असल्याचे भासवण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून, त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर वडूज येथील सत्र न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यावर गोरें यांच्या वतीने उच्च न्यायालयात जामीनअर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेताना गोरे यांना उच्च न्यायालयाने 9 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले असून पुढील सुनावणी 9 रोजी होणार आहे.