आमदार वैभव पिचड युतीच्या गळाला?

मुख्यमंत्री फडणवीसांसह उद्धव ठाकरेंची घेतली भेट ः जिल्हाभर भाजप प्रवेशाची चर्चा

अकोले – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार वैभवराव पिचड यांच्या राजकीय प्रवासाला वेगळे वळण मिळण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्यातच आज आ. वैभव पिचड यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवास्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे पक्षप्रवेशाची चांगलीच चर्चा रंगली.
आज आ. पिचड यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. राजकीय खलबते केली, अशी चर्चा आहे. तसे घडल्यास त्यांच्या भूमिकेने जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळेल.

थोरातांना राजकीय शह देण्याची रणनीती भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आखली आहे. विरोधी पक्षातील सावज टिपण्यास सुरुवात केली असून, राष्ट्रवादीचे अकोल्याचे आमदार वैभव पिचड त्यांच्या गळाला लागले आहेत ? गेला आठवडाभर पक्ष बदलाची खलबते झाल्यानंतर आज (दि. 24) सकाळी विखे पाटलांसह आमदार पिचड यांनी मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान गाठले.

पिचडांच्या भूमिकेने जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली असून, राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार असल्याने राज्यात राजकीय भूकंप’ होणार आहे? सकाळी मंत्री विखे पाटील व आमदार वैभव पिचड आपल्या खास मर्जीतील शिलेदारांसह मुंबईत दाखल झाले होते. सुरुवातीला त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी मसलत केली व त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पुढील राजकारणाची खलबते सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या वृत्ताने राज्यात राजकीय भूकंप होणार आहे.

सकाळी आमदार पिचड जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे आदींनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली आणि त्यांच्याशी राजकीय खलबते केली, अशी येथे चर्चा आहे. मात्र उद्या मुलाखतीसाठी आ. पिचड नगर येथे हजर राहणार असल्याचे सांगण्यात आले.

भेटीचा वेगळा अर्थ लावणे चुकीचे – फाळके

मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष मतदारसंघातील प्रलंबीत जलसंधारणाची कामे ती मार्गी लावण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीचा कुठलाही वेगळा अर्थ लावू नये, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.