आजारपणामुळे कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा ः सांगोल्याचे अकरावेळा केले नेतृत्त्व
सोलापूर (प्रतिनिधी) – सांगोला विधानसभा मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा विजयी झालेले आणि 54 वर्षे विधानसभेत आपल्या अनुभवाची जरब बसवलेले आमदार गणपतराव देशमुख आता विधानसभेत दिसणार नाहीत. त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती अस्वस्थेच्या कारणामुळे विधानसभा लढवणार नसल्याचे आमदार देशमुख यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेचा विधिमंडळतील आवाज क्षीण होणार आहे.
सांगोला तालुक्यातील कोळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी याबाबत घोषणा केली. मात्र शेकापचा बाल्लेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 94 हजार 374 मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा पराभव केला होता. शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतलेले गणपतराव देशमुख म्हणजे अत्यंत साधी राहणी असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे.
वयाची 93 वर्षे पूर्ण केलेल्या गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत. 1962ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. त्यानंतर 1972 आणि 1995चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांना भरभरुन मतांनी विजयी केले.
विशेष म्हणजे 2012मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता. महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार म्हणूनही गणपतराव देशमुख यांची ओळख आहे. त्यांचे सध्या वय 94 आहे. सलग अकरा वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रमाचीही देशमुख यांच्या नावे नोंद आहे.
नेहमीच विरोधी बाकावर
जुन्या जाणत्या नेत्यांमध्ये सर्वात अग्रणी असलेले नाव म्हणजे गणपतराव देशमुख. ते बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते. मात्र 1978मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले, त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999मध्ये शेकापने कॉंग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला. तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात पणनमंत्री म्हणून समावेश झाला होता.