आमदार बदलले, खेडचे प्रश्‍न जुनेच

तालुक्‍यात मोहिते गेले, गोरे आले तरी 15 वर्षांपासून समस्या तशाच

– रोहन मुजूमदार

पुणे – खेड तालुक्‍यात प्रत्येक पक्षांत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची जशी मोठी यादी आहे, तशीच यादी येथील स्थानिक प्रश्‍नांची आहे. हे प्रश्‍न 2009 ते 2014 आणि आता 2014 ते 2019 मध्येही तसेच आहेत. या 15 वर्षांच्या काळात पहिले 10 वर्षे माजी आमदार दिलीप मोहिते तर आताचे पाच वर्षे विद्यमान आमदार सुरेश गोरे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचा “गाडा’ लोकप्रतिनिधी म्हणून हाकत आहेत. मात्र, या मतदारसंघात गेल्या 15 वर्षांच्या कालखंडातील प्रलंबित प्रश्‍न आणखीनच “जटील’ झाले आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभेत येणाऱ्या या मतदारसंघाने पारंपरिक खासदारांना नाकारून नवीन व ताज्या दमाच्या उमेदवाराला संधी दिली. त्याच पद्धतीने आगामी विधानसभेत या मतदारसंघात मतदार जुन्यांनाच की नवीन आणि तडफदार चेहऱ्याला “आमदार’ म्हणून संधी देणार हे येणारा काळ सांगेल. यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांची नवीन चेहऱ्यांना व काम करणाऱ्यालाच “तिकिट’ देण्याची इच्छाशक्‍ती दाखवली पाहिजे, हीच मतदारांची माफक अपेक्षा आहे.

खेड विधानसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजपसह वंचित विकास बहुजन विकास आघाडी या पक्षांसह अपक्ष उमेदवार आमनेसामने ठाकणार आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे इच्छुकांची मांदियाळीच आहेत. तर शिवसेनेकडे विद्यमान आमदारांशिवाय अद्याप कोणताही चेहरा समोर आलेला नाही. भाजपकडून अतुल देशमुख इच्छुक असले तरी युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने भाजपला “मूग गिळून गप्प’ रहावे लागेल.

युतीची बोलणी सुरू असताना विद्यमान आमदारांबाबत असलेली नाराजी भाजपचे स्थानिक पातळीचे नेते बोलून दाखवतील, पण त्याचा काही उपयोग होईल असे सध्या तरी वाटत नाही.

वंचित विकास आघाडीचा फटका बसणार?
लोकसभेत वंचित विकास आघाडीचा फटका भाजप-शिवसेनेपेक्षा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सर्वाधिक बसला. याची जाण ठेवून वंचितला आघाडीत सामावून घेण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. त्यांना त्यात यश आले तर खेड-आळंदी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला अधिक कष्ट करावे लागणार नाहीत. जर “वंचित’ने स्वतंत्रच लढण्याचा निर्णय घेतला तर मातब्बरांचे मताधिक्‍य कमी करण्यात “वंचित’नक्‍की यशस्वी होणार यात कोणालाही शंका नाही.

“मनसे’च्या भूमिकेकडे लक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)चे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे लोकसभेच्या “रणसंग्रामात’ उतरले नव्हते; मात्र, “लावरे तो व्हिडीओ’ माध्यमातून त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली होती. आगामी विधानसभेत आपण सर्वच जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी नुकतीच केली असली, तरी “राज’ यांचा तरुणांवर असलेला “पगडा’ आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसे ज्या कल्पक बुद्धीचा वापर करते हे पाहता मनसेला आघाडीत सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कसोशीने प्रयत्न करीत आहे. हे राष्ट्रवादीसाठी बेरजेचे राजकारण आहे.

यंदा प्रचारात ठरणारे कळीचे मुद्दे
– मराठा आंदोलन हिंसक करण्यामागे दिलीप
– मोहितेंचा हात
– पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी फुटता फुटेना
– स्थानिकांना रोजगार नाही
– भामा आसखेड धरणग्रस्तांचे घोंगडे भिजतच
– बैलगाडा शर्यत
– कोणत्याही कामात टक्‍केवारी घेणे
– शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही
– वाढती गुन्हेगारी, अतिक्रमणे, रस्त्यांची दुरवस्था
– आळंदी, राजगुरूनगर, चाकण शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूककोंडी
– अवैध धंदे सर्रासपणे बोकाळले

इच्छुक उमेदवार
राष्ट्रवादी : माजी आमदार दिलीप मोहिते, बाबा राक्षे, ऋषिकेश पवार, शिवसेनेतून नुकतेच दाखल झालेले
रामदास ठाकूर.
शिवसेना : आमदार सुरेश गोरे
भाजप : अतुल देशमुख
अपक्ष : बंडखोरी करणारे किंवा अन्य चेहरे
वंचित विकास आघाडी : इजाज तांबोळी
कॉंग्रेस : अमोल पवार

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×