धनकवडी – के. के. मार्केट ते पद्मजा सोसायटीपर्यंत पावसाळापूर्व तयारी म्हणून 600 व्यास ऐवजी 900 एमएम व्यासाची ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु, ड्रेनेज लाइन मोठी व्यासाची टाकली जात असल्याने नालापात्र अरुंद होत आहे. कामांतील या त्रुटींमुळे नाल्याला पूर आला तर पाणी वाहून ते आंबील ओढ्यालगतच्या परिसरात शिरण्याचा धोका आहे, याची जबाबदारी तुम्ही घेता का? असा सवाल करीत आमदार भीमराव तापकीर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर डवरी, महापालिका ड्रेनेज विभागाच्या उपाभियंता ज्योती वेदपाठक, कनिष्ठ अभियंता स्वाती बिराजदार यांच्यासह संबंधीत अधिकारी उपस्थित होते.आमदार तापकीर म्हणाले की, ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. 2019मध्ये नाल्यास आलेल्या महापुरामुळे ड्रेनेज पाइपलाइन वाहून गेली होती. मोठे नुकसान झाले होते, याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठीच मोठ्या व्यासाच्या वाहिनी टाकल्या जात असल्या तरी नाल्याची रुंदी कमी असल्याने सदर कामात्र त्रुटी तसेच ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसते. प्राईमो कन्सल्टन्सीनुसार काम सुरू असून अशा पद्धतीच्या कामामुळे पूर स्थिती निर्माण झाल्यास, नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यास याची जबाबदारी संबंधीत अधिकारी घेणार का? ड्रेनेज वाहिनी टाकल्यानंतर नाल्याचे खोलीकरण करू शकत नाही, त्यामुळे खोलीकरण करून ड्रेनेज वाहिनी टाकण्यात याव्यात, अशी कडक सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना केली.
प्राईमो कन्सल्टन्सी नुसार बालाजी नगरलगत असलेल्या आंबील ओढ्यामध्ये ड्रेनेज लाइनचे काम सुरू आहे. पूर्वीपेक्षा तीन ते साडेतीन फूट पाइपलाइन खाली टाकण्याचे काम सुरू आहे. – ज्योती वेदपाठक,
उपअभियंता, ड्रेनेज विभाग महापालिका