आमदार भरणेंनी पोस्टमनचे काम केले

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचार सांगता सभेत खासदार बापट यांचा घणाघात

रेडा- पोस्टातून मनीऑर्डर आली म्हणजे ते पैसे पोस्टमनचे कधी होत नसतात;मात्र आमदार भरणे तुम्ही पोस्टनचे काम केले आहे. इंदापूर तालुक्‍याचा विकासनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी पालकमंत्री म्हणून देत असताना माझ्यापुढे कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा हा विषय नव्हता, तर गोरगरीब शेतकरी, नागरिकांचा होता, त्यामुळे तालुक्‍याच्या विकासासाठी निधी आणला म्हणून फुशारक्‍या मारू नका, अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी केली.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी शिक्षण मंत्री लक्ष्मणराव ढोबळे प्रमुख उपस्थितीत पार पडली, त्यावेळी खासदार गिरीश बापट बोलत होते. याप्रसंगी उमेदवार हर्षवर्धन पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, नानासाहेब शेंडे, मारुतराव वणवे, प्रचारप्रमुख कृष्णाजी यादव, विलास वाघमोडे, श्रीमंत ढोले, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विकास पाटील, अशोक वणवे, शिवसेनेचे नितीन कदम, भीमराव भोसले, आरपीआयचे संदिपान कडवळे, शिवाजी मखरे, शेतकरी संघटनेचे निलेश देवकर यांच्यासह पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

गिरीश बापट म्हणाले की, जेव्हा भाजप-शिवसेनेचे सरकार राज्यात आले, त्यावेळेस हर्षवर्धन पाटील मला भेटले होते. तेव्हा मी म्हणालो होतो की, तुमच्यासारखा माणूस सभागृहात पाहिजे होता.हर्षवर्धन पाटील तुम्हाला फटका बसला मात्र जो फटका खातो तोच जोराचा फटका देतो तुमचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसणार आहे. काही जणांनी इंदापूर तालुक्‍यात गलिच्छ राजकारण केल्यामुळे कोणाच्या चाव्या कोणाला फिरवल्या कोणाच्या कानात बोलले अशा घाणेरड्या राजकारणाचा परिणाम तुमच्या पराभवावर झाला होता, असे त्यांनी नमूद केले. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही मनोगत व्यक्‍त केले.

  • संस्थांची बदनामी पवारांनी थांबवावी – पाटील
    इंदापूर तालुक्‍यातील सर्व संस्थांचे कामकाज उत्कृष्ट सुरू आहे; मात्र अजित पवार हे या संस्थांची बदनामी करीत आहेत. आगामी काळात भाजप सरकार हे छत्रपती साखर कारखान्याला मदत करणार आहे. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाण्याचे विषय मार्गी लावणार असा शब्द दिला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये. तालुक्‍याच्या विकासासाठी कमळ चिन्हाला मतदान करावे, असे आवाहन उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)