संगमनेर ( प्रतिनिधी) – काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आणि राज्यातील कृषी, सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे आमदार बाळासाहेब थोरात यांना पुणे येथे नवरात्री महोत्सवात आमदार बाळासाहेब थोरात यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संत साहित्याचे अभ्यासक मा.आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, चित्रपट अभिनेते सुनील बर्वे, माजी आमदार मोहन जोशी, नवरात्र महोत्सवाचे आयोजक आबा बागुल, माजी मंत्री रमेश बागवे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी 1985 पासून संगमनेर तालुक्याचे विक्रमी मताधिक्याने प्रतिनिधित्व करताना ग्रामीण विकासातून संगमनेर तालुक्याला राज्यात आदर्शवत बनवले आहे.
सहकार, शिक्षण, कृषी ,जलसंधारण, समाजकार,ण साहित्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देताना राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, रोहयो ,पाटबंधारे, शालेय शिक्षण अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
महसूल मंत्रीपदाच्या काळात ऑनलाईन सातबारासह खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला. तर शिक्षण मंत्री काळात बेस्ट ऑफ फाईव्हचा व शिक्षणाचा मूलभूत अधिकार लागू केला. कृषीमंत्री पदाच्या काळात राज्यात एक लाख शेततळ्यांची निर्मिती केली.
याचबरोबर काँग्रेस पक्ष अडचणीत असताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळताना पक्षाला मोठे यश मिळवून दिले. देशात सर्वोच्च असणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटी त्यांची पहिल्या 21 सदस्यांमध्ये निवड झाली आहे
सुसंस्कृत नेतृत्व, अभ्यासू वृत्ती आणि मोठा जनाधार असलेल्या आ. बाळासाहेब थोरात यांचा नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारने त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाबद्दल पुणेतील नवरात्र महोत्सवाच्या वतीने त्यांना महर्षी हा सन्मानाचा पुरस्कार शानदार कार्यक्रमात देण्यात आला.
हा जनतेचा सन्मान : आमदार थोरात
हा पुरस्कार राज्यातील व संगमनेर तालुक्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेचा असून जनतेसाठी सतत काम करणे हाच आपला ध्यास आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात निर्माण करण्यासाठी राजकारण असते.
महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी वैभवशाली परंपरा आहे.हा वारसा आपण कायम जपला असून हा पुरस्कार या सर्वसामान्य जनतेचा असल्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.