वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली (तालुका हवेली) येथील ग्रामपंचायतची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून पुणे महानगर पालिकेत समावेश झाल्यानंतर वाघोलीतील विविध समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडे शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याकडून पाठपुरावा सुरू असून या पाठपुराव्यासाठी ग्रामस्थांचे देखील पाठबळ मिळत असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिली आहे.
वाघोली मधील विविध समस्या सोडवण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व विविध खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीत वाघोलीतील विविध समस्या सोडविण्याबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त सकारात्मक असल्याचे दिसून आले. आगामी काळात या समस्या लवकरात लवकर सुटणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिली.
वाघोली मधील विविध विकास कामांबाबत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पुणे मनपा मध्ये गावाचा समावेश होण्यापूर्वी अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी सकारात्मक पवित्रा घेतला आहे. याशिवाय पीएमआरडीए च्या वतीने वाघोली साठी राबवण्यात येणारी पाण्याची योजना यामध्ये तातडीने ही पाण्याची योजना पूर्णत्वास नेऊन वाघोली मध्ये पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याबाबत बजेट मध्ये तरतूद करू असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले.
घनकचरा व्यवस्थापनाबाबत वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने पुणे महानगरपालिकेत समाज जिल्ह्यात 23 गावांमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या नेमणुका लवकरच करण्यात येणार असल्याचे देखील आयुक्तांनी सांगितले. वाघोली मधील ग्राम सचिवालयाच्या जागेत वाघोली मधील ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून अद्यावत असे मनपाच्या वतीने प्रशस्त सर्व सुविधांनी युक्त हॉस्पिटल उभारण्यासाठी बजेट मध्ये तरतूद करण्यात येणार असल्याचे देखील आयुक्त यांनी आश्वासन ग्रामस्थांना दिले.
वाघोली मधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार या बाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल या शिवाय वाघोली मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प बाबत नागरिकांच्या मागणीचा विचार करून प्रकल्प अधिक प्रगल्भ बनवण्याबाबत मनपा आयुक्तांनी आश्वासन दिले याशिवाय जन्म-मृत्यूचे दाखले याची उपलब्ध होण्यासाठी वाघोली येथे कर्मचाऱ्यांची नेमणूक तसेच गृह प्रकल्पांच्या नोंदीबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. रस्ता दुभाजक यामधील वृक्ष लागवड व त्याचे संगोपन करण्यासाठी पाण्याची उपलब्धता याशिवाय वाघोली मधील गार्डन देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.
वाघोली मधील विविध समस्यांबाबत चे निवेदन पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना आमदार अशोक पवार, माजी जिल्हा परिषद रामभाऊ दाभाडे, शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, नगरसेवक बाबुराव चांदेरे,माजी सरपंच वसुंधरा उबाळे, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, शिवदास उबाळे, बाळासाहेब सातव सर, सुनील जाधवराव, गणेश सातव, किसन जाधव, विठ्ठल शिवरकर, बाळासाहेब शिंदे,सागर जाधव, भारत सातव, निखिल भाडळे, अनिल कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.