पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी हा आदेश दिला. दोषारोपपत्रांनतरचाही जामीन नाकारल्याने त्यांना आता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.
या प्रकरणी योगेश लकडे (वय 39, रा. आंबेगाव) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बॅंक गैरव्यवहार प्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसले हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावा नाही. आम्ही दहा कोटी रुपये भरण्यात तयार आहे. तसेच तपास पूर्ण झाला असून या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल आहे.
जामीन मंजूर कण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्यावतीने करण्यात आला. मात्र आरोपींविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावा आहे. 10 कोटी रुपयांतून काहीच साध्य होणार नाही. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत फुगवण्यात आली आहे. पुराव्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास पटारे यांनी बाजू मांडली.