आमदार अन्‌ इच्छुकांची लोकसभा “सेमिफायनल’

प्रत्येकाचा कस लागणार; जिल्ह्यातील सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला

नगर: लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सर्व पक्षांच्या आमदारांसह इच्छुकांसाठी “सेमिफायनल’ असणार आहे. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील बारापैकी भाजपने पाच विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली होती. आता तीच आघाडी आपल्या मतदारसंघात कायम राखण्यासाठी आमदारांची परीक्षा होणार आहे. तर विरोधी कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारसह इच्छुकांचाही चांगलाच कस लागणार आहे. विशेष म्हणजे यावरून सर्व पक्षातील इच्छुकांच्या परफॉर्मन्सचे एकप्रकारे ऑडिट होणार असून येणाऱ्या “रिजल्ट’वर बरेच काही अवलंबून असणार आहे.

जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ असून या दोन मतदारसंघात बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. या बारापैकी पाच मतदारसंघात भाजप, तीन राष्ट्रवादी, तीन कॉंग्रेस व एक शिवसेनेचा आमदार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे लढले होते. यात नगर दक्षिणेत भाजपचे तीन, राष्ट्रवादीचे दोन तर शिवसेनेचा एक आमदार आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप व शिवसेनेचे वर्चस्व असून त्यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे. भाजपचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार मोनिका राजळे तर शिवसेनेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्यावर मोठी भिस्त आहे. त्याबरोबर राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप व उमेदवार आ. संग्राम जगताप यांना मताधिक्‍क वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

इच्छूकांमध्ये चंद्रशेखर घुले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, प्राजक्‍त तनपुरे, अनिल राठोड, सुजित झावरे, निलेश लंके, रोहित पवार, मंजुषा गुंड यांचा कस लागणार आहे. शिर्डी मतदारसंघात कॉंग्रेसचे तीन, भाजपचे दोन तर राष्ट्रवादी एक आमदार आहे. कॉंग्रेसच्या उमेदवाराची भिस्त माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे अद्यापही या मतदारसंघाकडे फिरकले नाहीत. ते कॉंग्रेसचे काम करणार का शिवसेनेचे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सध्या तरी त्यांचा मुक्‍काम हा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आहे. आ. भाऊसाहेब कांबळे हे उमेदवार असले तरी त्यांच्या मतदारसंघात कॉंग्रेसची पुरती वाट लागली आहे. आ.वैभव पिचड यांनी वरवर काम सुरू केले असले तरी पंजा त्यांच्या दृष्टीने अडसर ठरत आहे. भाजपचे आमदार स्नेहलता कोल्हे व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर शिवसेनेची भिस्त आहे.

लोकसभा आटोपली की तिच्या निकालावर चर्चा करता करता विधानसभेची निवडणूक येऊन ठेपते. त्यामुळे लोकसभेत मतांची दरी कमी जास्त झाली तर ती विधानसभेत भरून काढण्यासाठी उमेदवारांकडे फारसा वेळ नसणार आहे. त्यामुळे विधानसभेसाठी प्रत्येक आमदार अन्‌ इच्छुकाला लोकसभेची निवडणूक हीच सेमिफायनल समजून काम करावे लागणार आहे.

लोकसभेचा इम्पॅक्‍ट विधानसभेवर

लोकसभा निवडणूक निकालाचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर निश्‍चितच होणार आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्ष आणि उमेदवार याबाबत मतदारांचे स्वतंत्र मत असले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांना आपल्या मतदारांसोबत संपर्क करीत प्रचाराचा एक राऊंड पूर्ण करण्याची संधी आहे. पक्षाचे मतदान कायम राहील, ते दुसरीकडे वळणार नाही, याकडे इच्छुकांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)