Assembly Election Results: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी आज संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले असून राज्याच्या राजकारणात एक अभूतपूर्व ऐतिहासिक वळण पाहायला मिळत आहे. सत्ताधारी द्रमुक (DMK) पक्षाचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना स्वतःच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. कोलाथूर या त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातून स्टॅलिन यांचा पराभव झाला असून, अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. स्टॅलिन यांचा कोलाथूरमध्ये पराभव – (Assembly Election Results) मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या पराभवामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना टीव्हीकेचे (TVK) उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी पराभूत केले. या अत्यंत चुरशीच्या लढतीत व्ही. एस. बाबू यांना ६४ हजारांहून अधिक मते मिळाली, तर मुख्यमंत्री स्टॅलिन हे जवळपास साडेसात हजार मतांच्या फरकाने मागे राहिले. तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात एखाद्या सत्ताधारी मुख्यमंत्र्याला एका नवख्या पक्षाच्या उमेदवाराने पराभूत करण्याची ही पहिलीच मोठी घटना मानली जात आहे. हेही वाचा – प. बंगालमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? ‘या’ 5 दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत विजय यांच्या ‘TVK’ पक्षाची जादू – सुपरस्टार विजय याने राजकारणात प्रवेश केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. निवडणूक आयोगाच्या दुपारी २:३५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, टीव्हीकेचे उमेदवार तब्बल १०७ जागांवर आघाडीवर आहेत, तर ५५ जागांवर ते दुसऱ्या स्थानावर आहेत. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ या जादूई आकड्याच्या दिशेने विजय यांचा पक्ष वेगाने वाटचाल करताना दिसत आहे. काही जागांवर ही लढत अत्यंत अटीतटीची असून कुंभकोणम, शोलावंदन आणि विक्रवंडी या मतदारसंघांत टीव्हीके उमेदवार अवघ्या १०० ते १५० मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत. द्रमुक आणि अण्णा द्रमुकची पीछेहाट – एकीकडे टीव्हीकेने मुसंडी मारलेली असताना, पारंपारिक शक्ती असलेल्या द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दुपारी अडीच वाजेपर्यंत सत्ताधारी द्रमुक केवळ ५७ जागांवर, तर अण्णा द्रमुक ५१ जागांवर आघाडीवर आहे. मात्र, एडपड्डी मतदारसंघातून अण्णा द्रमुकचे नेते आणि विरोधी पक्षनेते ई. पलाणीस्वामी यांनी आपली पकड कायम राखली असून, त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर ७८ हजारांहून अधिक मतांची मोठी आघाडी घेतली आहे. निकालाचा कल – तामिळनाडूच्या २३४ जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच ‘विजय फॅक्टर’ प्रभावी ठरल्याचे दिसून आले. जर टीव्हीकेने आपली आघाडी कायम राखली, तर तामिळनाडूमध्ये अनेक दशकांनंतर द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या व्यतिरिक्त तिसरा पर्याय सत्तेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.