कोट्यवधी किंमतीच्या जागेकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
महेश जाधव
मायणी – येथील चांदणी चौक परिसरामध्ये असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवा केंद्र कार्यालयाची दुरवस्था झाली असून हे ठिकाण आता सार्वजनिक शौचालय बनले आहे. कोट्यवधी रुपये किंमतीची जागा असूनही संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे कानाडोळा केला जात आहे.
सन 1985 दशकांमध्ये येथील चांदणी चौक (विटा रोड) शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाने विश्रामगृह बांधण्यात आले होते. याठिकाणी एक हॉल, दोन सूट शौचलय गृह तसेच समोर आयलंड, त्यात कारंजे तसेच संपूर्ण परिसरामध्ये विद्युत रोषणाई व वृक्षारोपण केले होते. या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती.
हे अधिकारी वेळावेळी संपूर्ण परिसराची स्वच्छता डागडुजी व इतर भौतिक सोयी सुविधा करत होते. मात्र गेल्या दहा वर्षांपासून या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाकडे येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
हे ठिकाण मुख्य चौकामध्ये असल्याने व या ठिकाणी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याने येणारे जाणारे वाटसरू, प्रवासी याठिकाणी शौचालयासाठी जात आहेत, तसेच रात्रीच्या वेळी हे उपकेंद्र तळीरामांचा अड्डा बनलेले आहे. तसेच परिसरातील कचराकुंडीचे स्वरुप झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
नियोजित सांगली-बारामती राज्य मार्गालगत असलेल्या या जागेला आज बाजारभावाप्रमाणे कोट्यवधी रुपये किंमत येऊ शकते तसेच या ठिकाणी व्यापारी तत्वावर गाळे काढले तर लाखो रुपयांचा फायदा सार्वजिनक बांधकाम विभागाला प्रतिमहिना होऊ शकतो. मात्र या ठिकाणी असलेले बुरूज विभागीय कार्यालय व सातारा कार्यालयातील अधिकाऱ्यांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.