मिठानगर-भाग्योदयनगरला विविध समस्यांनी ग्रासले

पालिका प्रशासनाचा कानाडोळा : अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
परिसरात अनधिकृत इमारतींमुळे परिसराला बळाल पणा आला आहे. यांच्यावर पालिकेकडून केली जाणारी कारवाईही जुजबी असते. केवळ दिखाव्यासाठीच ती होताना दिसते. त्यामुळे बांधकामांना आळा न बसता परिसरात निकृष्ट दर्जाचे बांधकामे रातोरात उभी रहात असल्याने एखादी इमारत कोसळून भीषण दुर्घटना होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेता, या भागातील अतिक्रमणे हटवून रस्ते रुंदीकरण व बेकायदेशीर बांधकामांना आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा मोठी जिवितहानी होण्याचा धोका संभवतो. याला सर्वस्वी पालिका प्रशासनच जबाबदार असेल, अशी भूमीका येथील नागरिकांनी घेतली आहे.

कोंढवा – पालिका प्रशासनाने बेकायदेशीर गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानंतर परिसराची अवस्था काय होते, याचे सर्वोत्तम उदाहरण पाहायचे असेल तर कोंढवा खुर्द येथील मिठानगर-भाग्योदयनगर परिसराला पालिका अधिकारी वर्गाने भेट द्यायला हवी. उंच इमारती, अरूंद रस्ते यातून मार्ग काढणे पादचाऱ्यांना अवघड झाले असून, अतिक्रमणांमुळे एक वाहनही सुरळीत रस्त्यावरून जावू शकत नाही. यामुळे परिसराला बकालपणा येऊन नागरिक हैराण झाले आहेत.

कोंढवा खुर्द परिसरातील मिठानगर-भाग्योदयनगर, शिवनेरीनगर या भागांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, पालिका प्रशासन या भागाला ज्या मूलभूत सोयीसुविधा देत आहे. त्या आपुऱ्या असून पहिली लोकसंख्या आणि सध्याची वाढलेली लोकसंख्या यामध्ये मोठी तफावत आहे. या परिसरात उंचच्या उंच अनधिकृत इमारती पाहायला मिळतात. मात्र, त्या इमारतीच्या मानाने रस्ते मोठे नाहीत. या इमारतींमध्ये कोठेही पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहने रस्त्यावरच लावली जात आहेत. त्यामुळे अगोदरच अरुंद असणारे रस्ते आणखी अरुंद झाले आहेत. त्यातच भर म्हणजे अतिक्रमणे करून रस्ता अडवला जात आहे. याकडे मात्र प्रशासन उघडपणे डोळेझाक करत आहे.

आठवड्यातील कोणताही दिवस असो परिसरातील रस्त्यांना यात्रेचे किंवा आठवडा बाजाराचे स्वरूप आलेले दिसून येते. काही रस्ते असे आहेत की, एक रिक्षा व्यवस्थित जाणे अवघड झाले आहे. ये-जा करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एखादी दुर्घटना घडली तर, तातडीची सेवा देणेही मुश्‍किल होते.

पालिकेचा कारभार वरातीमागून घोडे गेल्याच आठवड्यात ज्ञानेश्‍वरनगरमधील पाचमजली अनधिकृत इमारतीच्या कॉलमला तडे जाऊन कॉलम फाटला होता. या इमारतीमध्ये 70-80 नागरिक वास्तव्यास होते. दैव बलवत्तर म्हणून ही गोष्ट लवकर लक्षात आल्याने तातडीने ही इमारत रिकामी करण्यात आली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही इमारत धोकादायक असल्याने पालिकेकडून जमीनदोस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे. यात सदनिकाधारक रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे पालिकेने इमारत उभी राहण्यापूर्वीच ही कारवाई केली असती तर नागरिकांची फसवणूक व जीविताचा धोकाही टळला असता. परंतु, पालिका प्रशासनाचा कारभार मात्र वरातीमागून घोडे असल्याचा दिसून येतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.