मिताली पुन्हा अव्वल स्थानी

लंडन – भारतीय महिला क्रिकेट संघाची मर्यादित षटकांच्या सामन्यांनी कर्णधार मिताली राजने आयसीसीच्या एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पुन्हा प्रथम स्थान मिळवले आहे. मितालीचे 762 रेटिंग गुण झाले आहेत.

भारतीय कर्णधार आतापर्यंतच्या एकदिवसीय कारकिर्दीत नवव्यांदा प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे. 16 वर्षांपूर्वी तिने पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवले होते. महिला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 103 च्या सरासरीने 206 धावा केल्या. या मालिकेत ती सर्वाधिक धावा करण्याऱ्या फलंदाजांत पहिल्या क्रमांकावर होती.

2005 साली ती पहिल्यांदा एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांकाची फलंदाज ठरली होती. गेल्या आठवड्यात प्रथम क्रमांकाची फलंदाज ठरलेली वेस्ट इंडीजची स्टेफनी टेलर चार स्थानांनी घसरत पाचव्या स्थानावर घसरली आहे. दक्षिण आफ्रिकेची लिजेल ली, ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली आणि इंग्लंडची टॅमी ब्यूमॉन्ट यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि चौथे स्थान मिळवले आहे.

भारताची स्मृती मानधना 701 रेटिंग गुणांसह नवव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या यादीत झुलन गोस्वामी ही पहिल्या दहा क्रमांकात असणारी एकमेव भारतीय गोलंदाज आहे. तिला पाचवे स्थान मिळाले आहे, तर दीप्ती शर्मा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत 10 व्या स्थानावर आहे. मानधनाने टी-20 क्रमवारीत तिसरे स्थान मिळवले आहे. दीप्ती शर्मा 36 व्या आणि रिचा घोष 72 व्या स्थानावर आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.