जोहान्सबर्ग – महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. या सामन्यात पत्नी एलिसा हिली ऑस्ट्रेलियाकडून खेळत असून तिला प्रोत्साहन देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाचा प्रमुख गोलंदाज मिशेल स्टार्क याने दक्षिण आफ्रिकेचा दौरा अर्धवट सोडला आहे.
स्टार्कप्रमाणे त्याची पत्नी एलिसा ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची प्रमुख खेळाडू आहे. आपल्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण जेव्हा येतात तेव्हा त्याचा पुरेपूर लाभ घ्यायचा असतो. माझी पत्नी देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. मला तिचाच नव्हे तर संघाचा खेळ पाहायचा आहे ते देखील प्रत्यक्ष सामन्याला हजेरी लावून त्यामुळेच मी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यातून ब्रेक घेतला आहे, असे स्टार्कने सांगितले.
त्याच्या निर्णयाला संघव्यवस्थापन तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही पाठिंबा दिला आहे. तो पर्यटनासाठी नव्हे तर महिला विश्वकरंडक स्पर्धेत आपल्या पत्नीचा खेळ पाहण्यासाठी तसेच तिला प्रोत्साहन देण्यासाठी जात आहे, त्यामुळे आम्ही त्याला परवानगी दिली. तो आता आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी संघात परतेल, असे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी स्पष्ट केले आहे.