21 कोटी रुपयांची मदत करणार; 75 हजार विद्यार्थी, 5 हजार शिक्षकांचे सहकार्य
पुणे – अयोध्या येथे निर्माण होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या पवित्र कार्यासाठी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी 21 कोटी रुपयांच्या धनराशीची मदत करणार आहे, अशी घोषणा श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
यावेळी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदासजी महाराज देखील उपस्थित होते. माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे प्रमुख पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून ही राशी उभारण्यात येणार आहे.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विविध शाखांमधील सुमारे 75 हजार विद्यार्थी, 5 हजार शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून या पवित्र कामाच्या योगदानासाठी धनराशीची मदत करण्यात येईल.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे निधी जमा करण्यात येणार आहे. प्रभू श्रीरामचंद्रजी यांच्या सेवेसाठी केले जाणारे हे महान राष्ट्रधर्मपूजन, विश्वकल्याण आणि मानवकल्याणाचे कार्य तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या नावाने करण्याचे माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले.
गर्भगृहाची भव्य संकल्पना…
श्रीराम मंदिरातील सुंदर गर्भगृहाची निर्मिती शुभ्रधवल व सर्वोत्तम गुणवत्तेच्या मकराना संगमरवरामध्ये संस्थेतर्फे केली जाणार आहे. या भव्य गर्भगृहाचा आकार 30 फूट बाय 30 असा असेल. या गर्भगृहामध्ये 15 फूट उंचीचे 12 खांब असतील. 27 फूट उंचीचा सुवर्णजडीत ज्ञानज्योती रूप कळस त्यावर 81 फूट उंचीचे संपूर्ण संगमरवरामध्ये शिखर बांधले ज्यावर विविध देवदेवतांच्या प्रतिमा, अशी संकल्पना आहे. या भव्य गर्भगृहामध्ये प्रभू श्रीराम यांची साडे अकरा फूट उंच तसेच श्री लक्ष्मण व माता सीता यांच्या सवा नऊ फूट उंचीच्या संगमरवरच्या मूर्ती देखील उभारण्यात येणार आहेत.