पिंपरी, दि. 17 (श्रीपाद शिंदे ) – सायबर भामटे सर्वसामान्य नागरिकांपासून सर्व क्षेत्रातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना गंडा घालत आहेत. यातून आयएएस, आयपीएस अधिकारी देखील सुटलेले नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील, तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, आताचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे या अधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट सुरू करत सहकारी अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी पोलीस दप्तरी दाखल आहेत. तसेच थेट व्हॉट्स ऍप कॉल आणि मेसेज केल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नावाने पाच-दहा हजार रुपये मागितल्यास सहजपणे पैसे मिळतील, या उद्देशाने हे प्रकार केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकारांमुळे सायबर गुन्हेगारांना आता पोलिसांचीही भीती नसल्याचे अधोरेखित झाले आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून पैशांची मागणी केली. कृष्ण प्रकाश यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली. सायबर चोरट्यांनी मघीळीहपर र्चीालरळफ या नावाने बनावट खाते तयार केले होते. त्यासाठी कृष्ण प्रकाश यांचे फोटो देखील वापरण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी कृष्ण प्रकाश यांच्या फेसबुक फ्रेंडला मेसेज करून पेटीएमद्वारे दहा हजारांची आर्थिक मदत मागितली. मात्र, संबंधित मित्राने कृष्ण प्रकाश यांच्याशी संपर्क करून खात्री केली. त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला.
हुबेहूब आवाज काढून फसविण्याचा प्रयत्न
जानेवारी 2022 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने सायबर चोरट्याने व्हाट्सअप प्रोफाइल बनवले. त्यावर पाटील यांचे फोटो लावले आणि अकाउंटवरून नगरसेवक अजित गव्हाणे, अंबरनाथ कांबळे, लक्ष्मण सस्ते यांना व्हाट्सअप कॉल केला. हद्द म्हणजे आरोपींनी राजेश पाटील यांचा हुबेहूब आवाज काढून ऍमेझॉन गिफ्ट कार्डद्वारे आर्थिक मदतीची मागणी केली.
थेट पोलीस अधिकाऱ्यांना आयुक्तांच्या नावाने मेसेज
ऑगस्ट 2022 मध्ये सायबर चोरटयांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा फोटो आणि त्यांचे नाव वापरून व्हॉट्सऍपवर प्रोफाइल बनवली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाइटवरून शहर पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक घेऊन त्यावरून काही पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांच्या नावाने मेसेज केला.
पोलीस अधिकाऱ्यांच्या नावानेही बनावट अकाउंट
याचबरोबर, शहर पोलीस दलातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांच्या नावाने बनावट अकाउंट सुरू करून त्यावरून संबंधित अधिकाऱ्यांच्या मित्रांशी संपर्क करून पैशांची मागणी केल्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे हे सायबर भामटे खाकीलाही घाबरत नसल्याचे दिसत आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना टार्गेट केले जात असतानाही हे भामटे पोलिसांच्या हाती लागत नाहीत, हे यातले विशेष आहे.
विदेशातून ऑपरेट
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नावाने बनावट व्हॉटसऍप अकाउंट बनवून त्याद्वारे मेसेज करण्यात आला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड सायबर सेलने तांत्रिक तपास केला. ते सिमकार्ड भारतात असून त्या सिम वरील व्हॉट्सऍप अकाउंट विदेशातून ऑपरेट होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यावरून आरोपीची ओळख पटवून पुढील कारवाई करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
जे नागरिक मोबाइलमध्ये व्हॉट्सऍप वापरत नाहीत, त्यावर सायबर भामटे एक लिंक पाठवतात. त्या लिंकवर क्लिक करताच संबंधित नंबरचे व्हॉट्सऍप जगभरात कुठूनही वापरता येते. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी, असंबद्ध लिंक आल्यास सावध राहावे. खात्री केल्याशिवाय कुठल्याही ऑनलाइन लिंकवर क्लिक करू नये. काही घटनांमध्ये सोशल मीडिया अकाउंट विदेशातून ऑपरेट होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत, पण पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. – डॉ. संजय तुंगार, सायबर सेल