इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यास आदिवासी विकास आयुक्तांची मान्यता
नाशिक – ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलैच्या निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
करोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार करता मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करणेसंदर्भात आदिवासी विकासमंत्री ऍड. के. सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागातील शाळा आणि वसतिगृहे सुरू करण्यात येत आहेत.
आश्रमशाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार आश्रमशाळा या निवासी असल्याने पाल्याला शाळेत व वसतिगृहात पाठवण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे. तसेच शाळा आणि वसतिगृहे सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे, शालेय वेळापत्रक बनवणे, भोजन वेळेचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करणे आणि संशयित किंवा कोविडबाधित आढळल्यास योग्य ती दक्षता घेणे याबाबत देखील सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक-अधीक्षिका आणि गृहपाल यांची आहे.
ज्या ग्रामीण भागात किमान एक महिना आधी कोविड रुग्ण आढळलेला नाही अशा ग्रामपंचायत आणि तेथील पालकांशी चर्चा करून त्याप्रमाणे शाळा सुरू करणेसाठी मान्यता देण्यात आली आहे. या शाळा सुरु करण्यापूर्वीच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी किमान लसीकरणाचा पहिला डोस घेतला असणे आवश्यक आहे.