पुणे – करोना लसीकरण प्रभावीपणे राबवण्यासाठी “मिशन 100 डेज’ सुरू करण्यात आले आहे. केंद्र शासनाने 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची परवानगी दिली, तर 100 दिवसांत पुणे जिल्ह्यात लसीकरण मोहीम पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यामध्ये 45 वर्षांवरील सुमारे 30 लाख नागरिक असून आतापर्यण्त 12 लाख 73 हजार 681 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. दि.5 एप्रिल रोजी एका दिवसांत 85 हजार 126 नागरिकांना लसीकरण करण्यात आलेले आहे. आता जिल्ह्यात एका दिवसात 1 लाख नागरिकांना लसीकरण देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
सद्यस्थितीत 45 वर्षांवरील व्यक्तींना करोनाची लस देण्यात येत आहे. पुढील 30 दिवसात लसीकरणाचा हा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
केंद्रांची संख्या आणखी वाढतेय
जिल्ह्यात लसीकरण केंद्र संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. दि.2 एप्रिल रोजी जिल्ह्यात 504 लसीकरण केंद्रे होती. आता जिल्ह्यात लसीकरण केंद्रांची संख्या 559 इतकी झाली आहे.