साडेसहा हजार मिळकतधारक गायब? पोस्टाने पाठवलेली बिले पालिकेकडे परत

पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडे नोंदी असलेले सुमारे साडेसहा हजार मिळकतधारक गायब असल्याचे समोर आले आहे. त्यांना पोस्टाद्वारे पाठविण्यात आलेली बिले परत आली असून त्यांचा नेमका पत्ता शोधण्यासाठी महापालिकेकडून कर्मचारी नियुक्‍त केले जाणार आहेत. महापालिकेने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 8 लाख 74 हजार बिले पोस्टाद्वारे पाठविली होती.

महापालिकेकडून 2015 पासून शहरातील नागरिकांना पोस्टाच्या माध्यमातून दरवर्षाची बिले पाठविण्यात येतात. त्यापूर्वी हे काम बचतगटांच्या माध्यमातून केली जात होती. मात्र, बिले न मिळणे तसेच बिले कचऱ्यात टाकून दिली जात होती. त्यामुळे महापालिकेने हे काम पोस्टाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पालिकेने ही बिले योग्य पत्त्यावर जावीत यासाठी 2 वर्षे माहिती संकलित केली असून त्यानंतर आता परत येणाऱ्या बिलांचे प्रमाण 1 टक्‍क्‍याच्या खाली आले आहे. मात्र, ही बिलेही सुमारे साडेसहा हजार असल्याचे यावर्षी समोर आले आहे. त्यामुळे बिले न मिळाल्यास मिळकतधारक थकबाकी भरत नसल्याने महापालिकेचे उत्पन्न बुडण्याची शक्‍यता लक्षात घेऊन अशा मिळकतमालकांचा शोध घेऊन त्यांचा नेमका पत्ता घेणे तसेच मिळकतकरावरील अपूर्ण पत्ते पूर्ण करण्यासाठी विभागीय पेठ निरीक्षक आणि पेठ निरीक्षकांकडे ही जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून संबंधित मिळकतधारकांची योग्य माहिती संकलीत करण्यात येणार असल्याचे मिळकतकर विभागाचे प्रभारी प्रमुख उपायुक्‍त सुरेश जगताप यांनी स्पष्ट केले.

अर्धवट पत्ते अथवा संबंधित ठिकाणी आता मूळ मालक राहात नसल्याने सुमारे साडेसहा हजार बिले यंदा परत आली आहेत. एकूण बिलांच्या प्रमाणात हे प्रमाण 0.80 टक्‍के असले तरी, प्रत्येक मिळकतधारकाला बिल जाणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे या मिळकधारकांचा तसेच मिळकतींचा नेमका पत्ता शोधण्यासाठी सूचना देण्यात आल्या असून त्या अनुषंगाने कामही हाती घेण्यात आले आहे.
– सुरेश जगताप, प्रभारी प्रमुख, मिळकतकर आणि संकलन विभाग

Leave A Reply

Your email address will not be published.