जुआनेआउ, (अलास्का) : पश्चिम अलास्कामध्ये बेपत्ता झालेले छोटे प्रवासी विमान समुद्रावर साचलेल्या बर्फामध्ये दुर्घटनाग्रस्त अवस्थेत सापडले आहे. विमानातील सर्व १० प्रवाशांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. काल हे विमान बेपत्ता झाल्यापासून अमेरिकेच्या कोस्ट गार्डकडून हेलिकॉप्टरच्या मदतीने या विमानाचा शोध घेतला जात होता.
या शोधमोहिमेदरम्यान समुद्रात साचलेल्या बर्फामध्ये विमानाचे अवशेष आढळून आले. दोन बचाव कर्मचाऱ्यांना तेथे उतरवून विमानातील प्रवाशांना सुरक्षिततेची तपासणी केली गेली, असे कोस्ट गार्डचे प्रवक्ते माइक सालेम यांनी सांगितले.
बेपत्ता झालेले एकच इंजिन असलेले विमान बेरींग एअर या कंपनीचे होते. हे विमान उनालाकलीत येथून नोम येथे जात होते. विमानाने उड्डाण केले तेंव्हा बर्फ पडत होता आणि धुके देखील पसरले होते. तापमान वजा ८.३ अंशांइतके कमी होते, असे राष्ट्रीय हवामान सेवेने म्हटले आहे.
उड्डाणानंतर तासाभरातच विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. तेंव्हा विमान नोमाच्या अग्नेयेला ४८ किलोमीटर अंतरावर होते. तर नोमाची किनारपट्टी १२ किलोमीटरवर होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानात ९ प्रवासी आणि वैमानिक असे १० जण होते, असे अलास्का डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीने सांगितले.