यवतमाळ: यवतमाळ जिल्हयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उमरखेड तालुक्यातील हातनी येथील 8 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह सापडला आहे. ही चिमुकली 12 मार्चपासून बेपत्ता होती. तिला शोधण्यासाठी पोलिसांची पथक रवाना करण्यात आली आहे. आज शुक्रवारी चिमुकलीचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. चिमुरडीच्या अपहरणानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृन हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी गजानन भुरके याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हातनी येथील 8 वर्षाची चिमुकली मुळावा येथील प्राथमिक शाळेत दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होती. ती 12 मार्चला शाळेत जाण्यास निघाली होती. मात्र, शाळा सुटल्यानंतर ती घरी परतलीच नाही. नंतर नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही. अखेर तिच्या वडिलांनी पोफळी पीोलस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. मात्र, चिमुरडीचा थांगपत्ता लागला नाही. अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक तयार करण्यात आले. मुळावा येथील बसस्थानक समोरील एका दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात एक युवक चिमुरडीला गाडीवर बसवून घेऊन जाताना दिसला. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला. या प्रकरणातील संशयित आरोपी गजानन भुरके याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपीची पोलिसांनी कसून चौकशी केली असता भयानक सत्य समोर आले आहे. 12 मार्चलाच आरोपीने पुसद मार्गावरील घाटात चिमुरडीला ठार मारले. पोलिसांनी शुक्रवारी तिचा मृतदेह घटनास्थळवरून ताब्यात घेतला. चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिला ठार मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी व्यक्त केला आहे.