‘त्या’ आईचा टाहाे..मुलगी जिवंत परत मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही

पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमधून तरुणी बेपत्ता

आईचे आमरण उपोषण : प्रशासन म्हणते “डिस्चार्ज दिला’

पुणे – करोना पॉझिटिव्ह असलेल्या 33 वर्षीय लेकीला उपचारासाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू आहेत असे सुरुवातीस सांगणाऱ्या जम्बो प्रशासनाने नंतर मात्र “तुमची मुलगी येथे ऍडमिटच नव्हती,’ असे सांगितल्याचा आरोप रुग्णाच्या आईने केला. त्यानंतर आईने कोविड सेंटरबाहेर गुरुवारी आमरण उपोषण सुरू केले.

 

प्रिया गायकवाड यांना करोनाची बाधा झाल्यानंतर उपचारासाठी ससून रुग्णालयातून जम्बोमध्ये दाखल केले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कुटुंबीयांना सांगितले. मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली, तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये दाखलच नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप मुलीची आई रागिणी सुरेंद्र गमरे यांनी केला आणि जम्बो कोविड सेंटर येथे उपोषण सुरू केले.

 

त्यांच्या आंदोलनास रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे यांनी पाठिंबा दिला आणि उपोषणात सहभाग घेतला. “मुलगी जिवंत परत मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही,’ असा इशारा गमरे यांनी दिला.

 

संबंधित रुग्णाला आम्ही डिस्चार्ज दिला असून, गेटबाहेर गेल्यानंतर संबंधित व्यक्तीची जबाबदारी प्रशासनाची नसते. त्यांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली आहे. पोलीस पुढील तपास करतील.

– विक्रम कुमार, आयुक्त, मनपा

 

जम्बो कोविड सेंटरमधून निघून गेलेल्या त्या तरुणीची माहिती महापालिकेने पोलिसांना कळविणे आवश्यक होते. मात्र, महापालिका प्रशासनाने तशी माहिती दिलेली नाही. सीसीटीव्ही फुटेज, कागदपत्रे द्यायला हवी होती. मात्र, पालिकेकडून पोलिसांना काहीही देण्यात आलेले नाही. त्यामुळे तिच्या घरच्यांच्या सांगण्यावरून ही तक्रार नोंदवली आहे.

– मनिषा झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.