पुणे – जम्बो कोविड रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बेपत्ता झालेल्या महिलेचा दोन आठवड्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी शोध घेतला. शनिवारी पिरंगुट घाटात सापडली. दरम्यान, रुग्णालयातून मुलगी घरी न परतल्यामुळे तिची आई रुग्णालयासमोर आमरण उपोषणास बसल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस यंत्रणेने तिचा शोध घेतला.
प्रिया गायकवाड (33, रा. येरवडा) यांना दि. 29 ऑगस्टला जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ हलवले. मात्र, तेव्हापासून त्यांचा संपर्क झालेला नव्हता. तिला दि.13 सप्टेंबर रोजी “डिस्चार्ज’ही देण्यात येणार होता. मात्र, त्या दिवशी कुटुंबीय रूग्णालयात गेल्यानंतर प्रिया आढळल्या नाहीत. तक्रार देऊनही सापडत नसल्याने तिच्या शोधासाठी तिची आई उपोषणास बसली होती. यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वत: पीपीई किट परिधान करत जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रिया यांचा शोध घेतला. तसेच ती कोठे गेली, याचा शोध रस्त्यांवरील सीसीटीव्ही चित्रफितीवरून घेण्याचे काम सुरू होते. ती पिरंगुट येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिला शोधून काढले.
सापडली कोठे?
पोलिसांनी दुपारी प्रिया या नातेवाईकांकडे सापडल्याचे सांगितले. तर सायंकाळी त्या पिरंगुट घाटात सापडल्याचे सांगितले.