सीसीडी चे मालक व्ही जी सिद्धार्थ बेपत्ता

पुलावरुन उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय

मंगलोर – माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेते एस एम कृष्णा यांचे जावई तसेच कॅफे कॉफी डे या प्रसिद्ध कॉफी शॉपच्या चैनचे मालक व्ही जी सिद्धार्थ हे सोमवार पासून अचानक पणे बेपत्ता झाले आहेत. व्ही जी सिद्धार्थ हे मंगलोरमधून बेपत्ता झाले आहेत. यावेळी ड्रायव्हरने दिलेल्या माहिती नुसार सिद्धार्थ यांना नेत्रावती नदीच्या पुलावर अखेरचे पाहिले गेले होते. त्यामुळे त्यांनी नेत्रावती नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

याबाबत सिद्धार्थ यांच्या ड्रायव्हरचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. ड्रायव्हरने पोलिसांना अशी माहिती दिली की, “त्यांनी मला नेत्रावती पुलावर कार थांबवायला सांगितली. ते मला म्हणाले की, थोड्या वेळातच ते परत येतील. अर्ध्या तासानंतर मी त्यांना फोन केला. पण त्यांचा मोबाइल स्विच ऑफ येऊ लागला. तेव्हापासून ते परत आलेच नाही.’ सध्या सिद्धार्थ यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरसह कोस्टगार्डची देखील मदत घेतली जात आहे.

मंगोलर शहर पोलीस आयुक्तांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले की, काल ते बंगळुरुवरून हे सांगून निघाले की, ते सक्‍लेसपूरला जात आहेत. पण, मध्ये रस्त्यातच त्यांनी ड्रायव्हरला मंगोलरला गाडी वळवण्यास सांगितले. तिकडे जातनाच नेत्रावती नदीच्या पुलावर पोहचताच त्यांनी कार थांबवली आणि ते खाली उतरले. त्यावेळी त्यांनी ड्रायव्हरला थांबण्यास सांगितले. पण त्यानंतर ते परतलेच नाही. त्यांचा तपास करत असलेले डॉग स्क्वॉड देखील पुलाच्या मधोमधच येऊन थांबले.’
त्यांच्या बेपत्ता होण्याच वृत्त समजताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा, कॉंग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि बी एल शंकर यांनी तात्काळ एस एम कृष्णा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सध्या कर्नाटक पोलीस हे सीसीडीचे मालक सिद्धार्थ यांचा शोध घेत आहेत.

सिद्धार्थ यांचे कर्मचाऱ्यांना लिहिलेले पत्र व्हायरल

“सीसीडी’चे मालक व्ही जी सिद्धार्थ यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेले एक पत्र समोर आले आहे. सिद्धार्थ यांनी पत्रात म्हटले आहे की, मी खूप संघर्ष केला. पण एका भागीदाराचा दबाव आणखी सहन करु शकत नाही. कारण माझ्यावर सातत्याने शेअर विकण्यासाठी दबाव आणला जात आहे. यासाठी मी सहा महिन्यांपूर्वी एका मित्राकडून पैसे जमा केले होते. त्याचबरोबर इतर कर्जदारांचाही माझ्यावर प्रचंड दबाव आहे. प्राप्तिकर विभागाच्या तत्कालीन महासंचालकांनीही माझा प्रचंड छळ केला आहे.

मी प्रत्येक कर्मचाऱ्याला कणखर राहण्याची विनंती करतो. नवीन व्यवस्थापनाच्या नेतृत्वाखाली व्यवसाय पुढे न्या. ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या सर्व माझ्या एकट्याच्या आहेत. ज्या आर्थिक चुका झाल्या आहेत, त्याला मी जबाबदार आहे. माझे कर्मचारी, ऑडिटर आणि व्यवस्थापनाला माझ्या सर्व व्यवहाराची माहिती नाही. मी उद्योगपती म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलो आहे. कोणाची फसवणूक करण्याचा माझा उद्देश नव्हता. एकेदिवशी तुम्हाला हे समजेल. मी तुमची माफी मागतो, मला माफ करा, अशा आशयाचे पत्र सिद्धार्थ यांनी कर्मचारी आणि व्यवस्थापनाला संबोधून लिहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)