इथंही पालिका कर्मचाऱ्यांची हातचालाखी
पुणे – महाराष्ट्र दिनानिमित्त महापालिका भवनाच्या प्रांगणात साजरा करण्यात आलेल्या ध्वजारोहण समारंभाला मारलेली दांडी महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात केली जाणार होती. याबाबतचे आदेश निघताच, अनेक विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती त्या दिवशी रेकॉर्डवर घेण्यात आली आहे. त्यामुळे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा अचानक वाढू लागला आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी बील क्लार्कलाच चिरीमिरी देऊन कर्मचाऱ्यांनी उपस्थितीवर शिक्कामोर्तब करून घेतले आहे.
शासनाच्या आदेशानुसार सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 26 जानेवारी, 1 मे आणि 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) यानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहाणे बंधनकारक आहे. परंतु, बुधवारी (दि.1 मे) महापालिकेतील ध्वजारोहणासाठी तीन ते चार हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी केवळ 400 ते 500 अधिकारी, कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी कामगार विभागास या अनुपस्थितीबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, कामगार सल्लागार विभागाने सर्व विभागांना पत्र पाठवून उपस्थित कर्मचाऱ्यांची हजेरी मागविली. मात्र, अनेक विभागांकडून आपले कर्मचारी 100 टक्के उपस्थित असल्याची हजेरी देण्यात आली आहे. त्यामुळे जर सर्वच विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तर अतिरिक्त आयुक्त आणि इतर कर्मचाऱ्यांना ही गर्दी दिसली नाही का असा सवाल उपस्थित केला जात असून ही हातचालाखीची हजेरी महापालिकेत चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.