सौंदर्यस्पर्धांच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि यश मिळाल्यानंतर सिनेसृष्टीत येऊन स्टारडम, ग्लॅमर मिळवण्याचा प्रयत्न काही तरुणींनी गेल्या दोन दशकांत केला. यातील काहींनी सिनेसृष्टीत आपला स्वतःचा ठसाही उमटवला. ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन ही याची उत्तम उदाहरणे. यापैकी ऐश्वर्या सध्या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. पण मिस युनिव्हर्स राहिलेली 44 वर्षीय सुष्मिता सेन मात्र गेल्या दशकभरापासून रुपेरी पडद्यावरुन गायब आहे. पण आता 10 वर्षांनंतर सुष अभिनयाच्या क्षेत्रात पुनरागमन करणार आहे.
यापूर्वी 2010 मध्ये सुष्मिता “नो प्रॉब्लेम’ या चित्रपटात झळकली होती. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने पुनरागमन करणार असल्याचे सांगितले आहे. सुष्मिताने आपल्या इन्स्टाग्राम अकौंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली तिने काही ओळी लिहिल्या आहेत. सुष्मिता म्हणते की, माझ्या चाहत्यांनी 10 वर्षे माझ्या पुनरागमनाची वाट पाहिली. मला आयुष्याच्या प्रत्येक टप्पायावर प्रेम दिले आणि निष्ठा देऊन प्रोत्साहितही केलं.
मी फक्त तुमच्यासाठीच पुनरागमन करत आहे…’ अर्थात सुष्मिता नेमक्या कोणत्या चित्रपटातून कमबॅक करणार आहे हेअद्याप समजू शकलेलं नाही. पण नव्या वर्षांत ती एखाद्या चित्रपटात झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 1996 मध्ये दस्तक चित्रपटाच्या माध्यमातून सुष्मिताने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ती मैं हू ना, मैने प्यार क्यों किया, वास्तुशास्र, क्योंकी मैं झूठ नही बोलता यांसारख्या चित्रपटातून झळकल्यी. दोन मुलींना दत्तक घेतल्यावरून सुष्मिताची चर्चेत आली होती.