अनेक विषयांवर शास्त्रज्ञांनी सोप्या, मूलभूत वैज्ञानिक भाषेत उत्तर देण्याचे स्वीकारले आव्हान
पुणे – डास आणि घरगुती माशांमुळे करोना विषाणू पसरू शकतो का? आपल्या घरातील पाळीव प्राण्यांकडून संक्रमण होऊ शकेल याची आपणास चिंता वाटते का? संपूर्ण जग करोनाच्या साथीने ग्रस्त असताना सगळीकडे प्रचंड अस्थिरता आणि अस्वस्थता आहे. याचवेळी सर्व प्रकाराच्या समाज माध्यमांतून कोविड-19 बद्दल चुकीची माहिती, अवैज्ञानिक दावे आणि अंधश्रद्धा वेगाने पसरत आहे.
यातील अनेक विषयांवर भारतीय शास्त्रज्ञांनी सोप्या आणि मूलभूत वैज्ञानिक भाषेत उत्तर देण्याचे आव्हान स्वीकारले आहे. या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये देशभरातील वैज्ञानिक, ग्राफिक डिझाइनर्स आणि अनुवादकांचा समावेश असलेल्या “भारतीय वैज्ञानिक प्रतिसाद कोविड -19′ (आयएसआरसी) या उत्स्फूर्त कृती गटाने वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे अचूक आणि सुलभ पद्धतीने संवाद साधण्याचे ठरवले.
याबाबतीत “आयएसआरसी’चे समन्वयक आर. रामानूजन म्हणाले, “या गटाची सुरुवात केवळ
10 लोकांपासून झाली आणि आज यात भारताच्या विविध भागांतील अभियंते, वैज्ञानिक, सामाजिक शास्त्र संशोधक आणि पत्रकार असे 400 पेक्षा अधिक सदस्य आहेत.
कोविड-19 विषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी तसेच साध्या सोप्या भाषेत याविषयाच्या विज्ञानावर संवाद साधण्याच्या प्रयत्नांमध्ये मला योगदान द्यायचे होते. या गटातील अवैज्ञानिक दाव्यांचा पर्दाफाश करण्याच्या उपगटाचे समन्वय करण्याचा माझा अनुभव सुद्धा अतिशय अविस्मरणीय होता, अशी भावना मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन केंद्रामधील जीवशास्त्रज्ञ संध्या कौशिका यांनी सांगितले.
अवैज्ञानिक दावे खोडून काढणाऱ्या “आयएसआरसी’च्या उपगटातील प्रतिनिधीनुसार नवीन करोना विषाणू हा डासांमार्फत बिलकूल पसरत नाही. हा श्वसनसंस्थेशी संबंधित विषाणू आहे. एखादी व्यक्ती शिंकते किंवा तिच्या नाकातून किंवा लाळेतून बाहेर पडणाऱ्या द्रव्याच्या थेंबांमार्फत याचा प्रसार होतो.
अनेक ज्योतिषी आणि अध्यात्मिक स्वामी यांनी असा दावा केला आहे की करोनाचा विषाणूच्या संक्रमणाचा कालबद्ध प्रवास हा एका ठराविक पद्धतीने होतो आणि याचे अनुमान ज्योतिषशास्त्रनुसार करणे शक्य आहे. या दाव्याचे खंडन करताना या उपगटाने सोशल मीडियासाठी अनेक ग्राफिक पोस्टर्स जारी केली आहेत. याद्वारे त्यांनी हे सिद्ध केले आहे की खगोलीय ग्रह-ताऱ्यांचा मानवी शरीरावर किंवा सूक्ष्मजीवावर काहीही परिणाम होत नाही. याउलट या गटाचे असे म्हणणे आहे की, ग्रहण, नक्षत्रे आणि राहू या संकल्पनांचा मानवी आयुष्यावर कोणताही परिणाम होत असल्याचा कुठलाच पुरावा आता उपलब्ध नाही. या विषाणूच्या महामारीचा उद्रेक होण्यामागे कोणत्याही ज्योतिषशास्त्रीय धारणेचा किंवा श्रद्धेचा काहीही संबंध नाही.
आयसर कोलकाताचे खगोलशास्त्रज्ञ दिबेन्द्यू नंदी म्हणाले, “हा विषाणू समाजाच्या सर्व स्तरांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर उलथापालथ घडवून आणत आहे. त्यामुळे आम्हाला शहरी उच्चभ्रू लोकांच्या पलीकडे जाऊन शक्य तितक्या प्रादेशिक भाषांमध्ये, भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत विज्ञान आणि तार्किकतेचा विचार पोहोचवायचा आहे. आमच्या गटातील 14 भाषांमध्ये काम करणाऱ्या कृतिशील व्यक्तींमुळे इंग्रजी व्यतिरिक्त हे ज्ञान आता पुढे जात आहे. नंदी यांनी कोविड-19 संबंधात अनेक अवैज्ञानिक दावे आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विज्ञान संवादकाचे काम करत यासाठी योगदान दिले.
250 पेक्षा अधिक पोस्टर्सच्या प्रतिमा विकसित
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई येथील खगोल भौतिकशास्त्रज्ञ अनिकेत सुळे यांनी अनुवादाचे समन्वय करण्याचे काम केले. ते म्हणाले, “या कामासाठी आमच्याकडे आयुका तसेच आयआयटी मुंबई येथील खगोलशास्त्रज्ञांचा प्रतिभावान गट होता ज्यांनी सर्व भाषांतील प्रतिमा तयार करण्याचे काम स्वयंचलित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केले आणि हे करताना सर्व भाषांतील मजकूर निर्दोष आहे याची काळजी घेतली. अगदी कमीत कमी वेळात आमच्या उपगटाने 250 पेक्षा अधिक पोस्टर्सच्या प्रतिमा विकसित करण्याचे काम केले.