सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री विद्या बालन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या “मिशन मंगल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली कोटींची उड्डाणे सुरूच ठेवली आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या यशाने चित्रपटातील कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून हा अक्षयचा 200 कोटींचा गल्ला जमवणारा पहिलाच चित्रपट आहे.
महिनाभरा नंतरही “मिशन मंगल’ची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. 15 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अक्षय कुमारसह शर्मन जोशी, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, तापसी पन्नू, नित्या मेनन आणि एच. जी. दत्तात्रेय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. “भूषण खिलाडी’ नावाच्या ट्विटर हॅंडलवरून कोड्यात टाकणारा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओत सर्व भाग सेट झाल्यानंतर अखेरीस चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिसतो. या व्हिडिओला अक्षय कुमारने उत्तर दिले आहे. अभिनेत्री विद्या बालननेही चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “मी खूप खूश आहे. सगळ्यांचे आभार मानते. लोकांना हा चित्रपट मनापासून आवडला. मलाही या चित्रपटासाठी खूप प्रेम मिळाले,’ असे विद्या यावर उत्तर देताना म्हणाली आहे.