ड्युटी मिळेना : दोन-तीन दिवस आगारात बसून राहण्याची वेळ
पुणे – पीएमपीच्या भेकराईनगर आगारातील बदली वाहकांना ड्युटी मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या आगारात सुमारे 50 बदली वाहक आहेत. मात्र, भेकराईनगरमध्ये कायम वाहकांची संख्या जास्त असल्याने बदली वाहकांना दोन-तीन दिवस आगारात बसून राहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे, कुटुंबाचा उदनिर्वाह चालवायचा कसा? असा प्रश्न रोजंदारीवरील वाहकांना पडलेला आहे.
भेकराईनगर आगारातून केवळ ई-बसचे संचलन सुरू असते. त्यामुळे येथून शिवाजीनगर, कोथरुड, कात्रज, मनपा, रेल्वे स्टेशन, निगडी, भोसरी व इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची वर्दळ असते. या आगारात सुमारे 150 कायम वाहक कार्यरत असून 50 बदली वाहक आहेत. मात्र, कायम वाहकांना ड्युटी देणे बंधनकारक असल्याने बदली वाहकांना बसून दिवस काढावे लागत आहेत. या ठिकाणी आठवड्यातून किमान चार ते पाच दिवस ड्युटी देण्याची मागणी बदली सेवकांनी केली आहे. दरम्यान, ही मागणी जुनीच असूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
महिन्याकाठी मिळते तुटपुंजी रक्कम
भेकराईनगर आगारात कायम वाहकांची संख्या जास्त असल्याने हे वाहक आठवड्याच्या सुट्टीवर गेल्यानंतर बदली वाहकांना ड्युटी मिळते. एका दिवसात सुमारे सात ते आठ कायम वाहक सुट्टीवर असल्याने तेवढ्याच बदली वाहकांना ड्युटी मिळत आहे. त्यामुळे आठवड्यातील दोन ते तीन दिवस ड्युटी मिळत असल्याने बदली वाहकांचा एका दिवसाची 600 रुपये हजेरी मिळून महिन्याचा सरासरी पगार सहा ते साडेसहा हजार मिळत असल्याचे वाहकांनी सांगितले.
या ठिकाणी कायम सेवकांची संख्या जास्त असूनही बदली वाहकांना एक दिवसाआड ड्युटी दिली जात आहे. तसेच भेकराईनगर आगारात बदली वाहकांना ड्युटी न मिळाल्यास दुसऱ्या डेपोतून दिली जात आहे.
– नारायण कर्डिले, डेपो मॅनेजर, भेकराईनगर