fbpx

विविधा : आर. के. लक्ष्मण

माधव विद्वांस

प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण तथा रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांचा आज जन्मदिन. वृत्तपत्रात कोणाच्याही शारीरिक व्यंगावर बोट न ठेवता प्रचलित घटनेचे मर्म संबंधित व्यक्‍तीला चिमटा काढून लोकांच्या पुढे आणणारे व्यंगचित्रकार म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांचा जन्म 24 ऑक्‍टोबर 1921 रोजी म्हैसूर येथे झाला. त्यांचे वडील म्हैसूर येथील शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांच्या शाळेसाठी नियतकालिके त्यांच्या घरी येत असत. त्यामुळे “हार्पर्स’, “पंच’, “ऑन पेपर’, “बॉइज’, “अँटलांटिक’, “अमेरिकन मर्क्‍युरी’, “द मेरी मॅगझिन’, “स्ट्रॅन्ड मॅगझिन’, अशी मासिके त्यांना तिथे पाहायला-वाचायला मिळत होती.

लक्ष्मण त्यांतील विविध विषयांवरील चित्रे आवडीने पाहत असत, अशी चित्रे त्यांनाही काढावीशी वाटू लागली व ते चित्रे रेखाटू लागले. त्यांचा काही चित्रांना स्थानिक वृत्तपत्रांत जागा मिळू लागली. पुढे त्यांनी मुंबईमधील जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌मध्ये प्रवेशासाठी अर्ज केला होता, पण तेथे त्यांना प्रवेश दिला नाही. आर. के. लक्ष्मण यांनी कथा, निबंध, कादंबरी आणि प्रवासवर्णनांची पुस्तके लिहिली. “मालगुडी डेज्‌’ हे पुस्तक लिहिणारे आर. के. नारायण हे त्यांचे बंधू. त्यांच्या पुस्तकातील प्रसंगानुरूप बोलकी चित्रेही लक्ष्मण यांनीच चितारली होती.

त्यांनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी मिळविली. त्यानंतर नोकरी मिळविण्यासाठी ते दिल्लीला गेले. तेथेही एका वृत्तपत्राने लक्ष्मण यांचे वय कमी असल्याचे कारण पुढे करून नोकरी नाकारली होती. त्यानंतर काही काळ ब्लिट्‌झमध्ये आणि नंतर फ्री प्रेस जर्नलमध्ये लक्ष्मण यांनी काम केले. मात्र फ्री प्रेसच्या मालकांचा “कम्युनिस्टांची टिंगल करायची नाही’, असा अलिखित नियम होता. म्हणून त्यांनी “फ्री प्रेस’ची नोकरी सोडली.

वर्ष 1953 मध्ये ते राष्ट्रीय दैनिकात हजर झाले आणि प्रत्येक व्यंगचित्रात दिसणारा जगप्रसिद्ध “कॉमनमॅन’ येथेच त्यांच्या कुंचल्यातून साकारला गेला. चौकटीचा कोट, गोल भिंगाचा चष्मा, धोतर आणि चेहऱ्यावर कायम स्थितप्रज्ञतेचे भाव असलेला “कॉमनमॅन’ पुढील 50 वर्षे रोज सकाळी वाचकाला भेटत राहिला होता. “वा! छान बोललात!’ (यू सेड इट) नावाने त्यांनी फक्‍त व्यंगचित्र असलेले एक सदर सुरू केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे चित्रस्वरूप सदर लोकप्रिय झाले होते. एखाद्या मोठ्या घटनेवरील आधारित व्यंगचित्र मधोमध छापले जात असे. ठळक बातमी वाचण्या अगोदर वाचकाचे लक्ष अगोदर “कॉमनमॅन’ काय म्हणतो याकडे जात असे. व्यगंचित्रातील आशय पाहून वाचकाच्या चेहऱ्यावर हास्यभाव प्रकट होई व मग वाचक मुख्य बातमीकडे वळत असे. त्यांच्या निवडक व्यंगचित्रांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत तसेच लक्ष्मण यांनी “एशियन पेन्ट्‌स’साठी गट्टूचे चित्रही काढले होते. भारतातील राजकारणी तर त्यांचा आवडीचा विषय होता. राजकारणी त्यावेळी त्यांना खूप वचकून असत. सध्याच्या काळात त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते.

सिम्बॉयसिस परिसरात त्यांच्या स्मरणार्थ “कॉमनमॅन’चा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांचे वास्तव्य पुणे येथे होते. त्यांचे निधन 26 जानेवारी, 2015 रोजी पुणे येथे झाले. पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच मॅगसेसे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.