विविधा: न. चिं. केळकर

– माधव विद्वांस
साहित्यसम्राट, पत्रकार, केसरी-मराठा दैनिकांचे संपादक, पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष नरसिंह चिंतामण केळकर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब या गावी 24 ऑगस्ट 1872 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मिरज, कोल्हापूर, पुणे येथे आणि मुंबई येथे बी.ए. एलएल.बी. पर्यंतचे शिक्षण घेतले. डेक्कन कॉलेजात असताना केळकरांना नाटकाची गोडी लागली. वर्ष 1895 साली सातारा येथे त्यांनी वकिलीस प्रारंभ केला.
वर्ष 1896 मध्ये लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून तसेच टिळकांनी काढलेल्या वकिलीच्या वर्गाचे शिक्षक व मराठा या पत्राचे संपादक म्हणून पुण्यास आले. वर्ष 1908 मधे टिळकांना झालेल्या शिक्षेच्या संदर्भात ‘द टिळक केस’ या लेखाबद्दल त्यांना दंड व 14 दिवसांची कैद झाली होती. वर्ष 1912 व 1918 मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अनुक्रमे उपाध्यक्ष व अध्यक्ष होते. वर्ष 1921 मध्ये बडोदे येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. वर्ष 1918 मध्ये काँग्रेस व होमरूल लीगतर्फे ब्रिटनला जाणार्या शिष्टमंडळाचे चिटणीस म्हणून त्यांची निवड झाली.
इंग्लंडमध्ये असताना ब्रिटिश इंडिया काँग्रेस कमिटीच्या ‘इंडिया’ या पत्राचे संपादन त्यांनी केले. 1920 मध्ये सोलापूर येथे भरलेल्या काँग्रेस आणि होमरूल लीग या दोन्ही पक्षांच्या संयुक्त प्रांतिक परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांनी तीन लाख रुपयांचा टिळक पर्स फंड जमवून टिळकांना अर्पण केला. स्वराज्य पक्षातर्फे 1923 मध्ये त्यांची कायदेमंडळावर निवड झाली. 1927 मध्ये पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. वर्ष 1931 मधे बडोदे वाङ्मय परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.तसेच त्याच वर्षी उज्जैन येथे भरलेल्या मध्य भारतीय कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
तत्कालीन राजकारणात जहाल व नेमस्त या दोन टोकांच्या विचारांना टाळून मध्यम भूमिका त्यांनी स्वीकारली. टिळकांनंतर महात्मा गांधींच्या असहकारितेच्या चळवळीमध्ये ते सामील झाले. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकारिणीचेही ते सभासद झाले परंतु असहकारितेचे आंदोलन गांधींनी मागे घेतल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षात ते गेले. त्यांचा राजकीय प्रवास मंदावला आणि त्यांनी साहित्यावर लक्ष केंद्रित केले.
सह्याद्री मासिकाचे ते 1935 ते 1947 या काळात संपादक होते. साहित्य क्षेत्रातील अनेक संस्थांचे अध्यक्षपद, अनेक ग्रंथांना प्रस्तावना, अनेक सभांच्या अध्यक्षपदावरून केलेली महत्त्वपूर्ण समयोचित भाषणे ही त्यांच्या वैचारिक साहित्यिक कर्तृत्वाची ओळख होती. नाटक, कादंबरी, लघुकथा, कविता, निबंध, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा या सर्वच वाङ्मय क्षेत्रांत त्यांनी लेखन केले.
इतिहास, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयांच्या क्षेत्रांतही त्यांनी लेखन केले. म्हणून ‘साहित्यसम्राट’ ही उपाधी लावली गेली. लोकमान्यांचे चरित्राचे 3 खंड, मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, तोतयाचे बंड (नाटक) कोकणचा पोर, बलिदान यांसह 8 कादंबर्यांचे लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. 14 ऑक्टोबर 1947 रोजी त्यांचे निधन झाले.





