– माधव विद्वांस
‘दि रोज सोसायटी ऑफ पुणे’ची स्थापना करणारे केसरी वृत्तपत्राचे संपादक, माजी संसद सदस्य व महाराष्ट्राचे माजी मंत्री तसेच विधान परिषदेचे सभापती जयंतराव टिळक यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म पुणे येथे 12 ऑक्टोबर 1921 रोजी झाला. जयंतराव हे लोकमान्य टिळकांचे नातू. जयंतरावांचे वडील श्रीधरपंत टिळक हे डॉ. आंबेडकरांचे पाठीराखे होते, हे विशेष. ग. वि. केतकर निवृत्त झाल्यावर सन 1950 मध्ये जयंतराव टिळक केसरीचे संपादक झाले.त्यांच्या कारकिर्दीतच आठवड्यात 2/3 वेळा प्रसिद्ध होणारा केसरी 8 ऑक्टोबर 1962 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर दैनिक केसरी झाला.केसरीचा प्रवास काँग्रेस, हिंदू महासभा व परत काँग्रेस असा राहिला.
जयंतराव श्रीधर टिळक यांनी गुलाबाच्या लागवडीस चालना देण्यासाठी वर्ष 1962 मध्ये पुण्यातील गुलाबप्रेमी लोकांना एकत्र आणून ‘दि रोज सोसायटी ऑफ पुणे’ची स्थापना केली. या बागेचा वापर ‘दि रोज सोसायटी ऑफ पुणे’तर्फे संशोधनासाठीही केला जातो. संस्थेतर्फे मासिक बैठका घेतल्या जातात. यावेळी गुलाबतज्ज्ञांना व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाते. याव्यतिरिक्त ही बाग जनतेसाठी दररोज सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 4 ते 8 या वेळेत खुली असते.
वृत्तपत्राचे धोरण हिंदुसभावादी असले तरी गोवा मुक्तिसंग्रामात आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यात जयंतराव टिळक यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ष 1957 मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीने एकत्र येऊन काँग्रेसचा मुकाबला करायचं ठरवलं. त्यावेळी हिंदू महासभेच्या वतीने जयंतराव टिळकांचं नाव पुढं आलं. ते समितीच्या तिकिटावर पुण्यातून पहिल्यांदाच विधानसभा लढले आणि निवडून देखील आले.
यशवंतराव चव्हाण व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री हे मानवेंद्रनाथ रॉय यांचे अनुयायी होते. हे दोघेही काँग्रेसमध्ये होते. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी महाराष्ट्र घडवताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे काँग्रेसपासून दूर गेलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले. यालाच ‘बेरजेचे राजकारण’ म्हणून ओळखले जाते. मोरारजी देसाई यांच्या कारभारामुळे काँग्रेसपासून दूर गेलेली पिढी यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नामुळे पक्षाशी जोडली गेली. त्यांच्या प्रयत्नातून शेतकरी कामगार पक्ष, प्रजा समाजवादी, कम्युनिस्ट पार्टी अशा अनेक पक्षातून नेते परत काँग्रेस मध्ये सामील झाले.
जयंतराव राज्यसभेवर गेले. इंदिरा गांधीच्या नेतृत्वाचा पुरस्कार सुरू झाला. सन 1980 च्या जून महिन्यात जयंतराव इंदिरा गांधींच्या इच्छेप्रमाणे ते अंतुले मंत्रिमंडळात मंत्री झाले. जयंतरावांच्या कारकिर्दीत विशेषतः 1980 नंतर केसरी समाजाभिमुख झाला. केसरी दलितांच्या सामाजिक चळवळींची दखल घेऊ लागला. ‘काळ कोणाकरताच थांबत नाही. थांबला तो संपला हा सृष्टीचा कठोर नियम आहे’ त्यानुसार कालानुरूप बदल करण्याचा यशस्वी प्रयत्न जयंतरावांनी केला. 23 एप्रिल 2001 रोजी वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.