– माधव विद्वांस
प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती, काँग्रेसचे माजी अध्यक्ष, भारतरत्न डॉ.राजेंद्रप्रसाद यांचा आज जन्मदिन.त्यांचा जन्म बिहारमधील सारन जिल्ह्यातील जीरादेई या खेड्यात 3 डिसेंबर 1884 रोजी झाला. त्यांचे वडील महादेव हे युनानी व आयुर्वेदीय औषधोपचार वैद्य होते.त्यांच्या मातोश्री मलेश्वरीदेवी धार्मिकवृत्तीच्या होत्या. त्यांच्या संस्कारांचा प्रभाव राजेंद्रबाबूंच्या जीवनावर होता. राजेंद्रप्रसादांचे प्राथमिक शिक्षण मौलवींतर्फे घरी झाले. त्यामुळे त्यांना उर्दू आणि फारसी या भाषा अवगत झाल्या. दरम्यान, जून 1896 मध्ये वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचा विवाह राजवंशीदेवी यांच्याशी झाला.
पुढे छपरा, हथवा व पाटणा या ठिकाणी शालेय शिक्षण घेऊन त्यांनी कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयांतून बीए, एमए आणि मास्टर इन लॉ या पदव्या संपादन केल्या. त्यांना अनेक पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळाल्या.विद्यार्थीदशेतच त्यांनी स्वदेशी व लोकसेवेचे व्रत घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरुवातीस काही वर्षे त्यांनी अध्यापन केले आणि नंतर कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. पाटणा येथे उच्च न्यायालय स्थापन झाल्यानंतर ते तिथे वकिली करू लागले. तेथे ते एक निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध झाले.
वर्ष 1906 मधील काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले. कालांतराने गांधीजींनी दाखवलेल्या समर्पण, दृढनिश्चय आणि धैर्याने ते खूप प्रभावित झाले आणि उत्साही स्वयंसेवक या नात्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर गांधीजींना सर्वतोपरी मदत करू लागले.गांधीजींच्या वैचारिक प्रभावामुळे त्यांच्या अनेक मतांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला व जात आणि अस्पृश्यता याबाबतीतील त्यांची मते बदलली.
पाटणा नगरपरिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. वर्ष 1911 मध्ये काँग्रेसचे सभासद झाले. बिहारमधील वर्ष 1917 मधे झालेल्या चंपारण्य सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. हा सत्याग्रह यशस्वी होऊन सरकारने तीन कठियांचा कायदा रद्द केला. त्यानंतर राजेंद्रबाबूंचा गांधीजींशी वारंवार संबंध येऊ लागला. त्यानंतर रौलेट कायदा रद्द व्हावा, म्हणून देशात झालेल्या सार्वत्रिक सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. त्यानंतर ते बिहार प्रांतिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आले.
त्यानंतर त्यांनी वकिली सोडून दिली व महात्मा गांधींच्या चतुःसूत्रीचा स्वीकार करून त्यांचे अनुयायित्व स्वीकारले. पाटण्यात त्यांनी राष्ट्रीय विद्यापीठ स्थापून स्वदेशी, मद्यपानबंदी, खादीचा प्रसार या कार्यक्रमांना वाहून घेतले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांनी महापंडित राहुल सांकृत्यायन (मूळ नाव केदानाथ पांडे) यांच्याशी संवाद साधला. राहुल सांकृत्यायन यांच्या बौद्धिक सामर्थ्याचा खूप प्रभाव पडला.
वर्ष 1930 च्या कायदेभंग चळवळीत राजेंद्रबाबूंनी महत्त्वाची भूमिका वठविली.त्यावेळी त्यांना दोनदा तुरुंगवास भोगावा लागला. स्वातंत्र्यास मान्यता मिळाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अंतरिम सरकारमध्ये त्यांना अन्न आणि कृषी खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. त्यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने नवीन संविधान लागू केले व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते 12 वर्षे राहिले. पाटणा येथे 28 फेब्रुवारी 1963 रोजी त्यांचे निधन झाले.