विविधा : भटजी पैलवान

माधव विद्वांस

सेनापती बापट, डॉक्‍टर खानखोजे व डॉक्‍टर मुंजे यांना क्रांतिकार्याची दीक्षा देणारे व भटजी पैलवान म्हणून क्रांतिकारकांमध्ये प्रसिद्ध असणारे क्रांतिकारक कै. , तथा भिडे गुरुजी यांचे आज पुण्यस्मरण. (मृत्यू 7 डिसेंबर 1948). भिडे घराणे हे कोकणातील निवेंडी गावचे. त्यांचे पूर्वज साताऱ्याजवळील महागाव येथे स्थायिक झाले. त्यांचे वडील नोकरीसाठी पुणे येथे गेले होते. त्यांचा जन्म 22 जुलै 1876 रोजी पुणे येथे झाला. प्राथमिक शिक्षण देखील पुणे येथे झाले. परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. मात्र लहानपणापासून कुस्ती, दांडपट्टा, मल्लखांब, नेमबाजी इत्यादी पारंपरिक खेळाची त्यांना आवड होती. तालमीत व्यायाम करणे, घोडेस्वारी, कुस्ती यात ते रमत असत.

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर पडल्यावर ते फॉरेस्ट खात्यात नोकरीस लागले. मात्र ब्रिटिशांविरुद्धचा राग मनात होताच. या दरम्यान त्यांची ओळख चापेकर बंधू व सहकाऱ्यांशी झाली. सर्वांनी मिळून “चापेकर क्‍लब’ नावाचा क्रांतिकारी गट स्थापन केला. डॉक्‍टर अण्णासाहेब पटवर्धन त्यांचे गुरू होते. त्यांनी आयुर्वेदिक औषध उपचार व सैनिकांवरील उपचार भिडेंना शिकवले. गुरूंनी सांगितलेल्या, कोणतेही पुरावे मागे ठेवू नयेत व कमी बोलावे या सूचनेचे पालन भिडे गुरुजींनी कायम केले.

रॅंडच्या खुनानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, मात्र कोणताही पुरावा सरकारला मिळाला नाही. इंग्रजांनी आपल्या जुन्या शक्‍तिवर्धक खेळांना जाणूनबुजून, क्षात्रतेज नष्ट करण्याचे धोरण अवलंबले आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे, शिराळ्यास बदली झाल्यावर त्यांनी नोकरी सोडली व तरुणांमध्ये शक्‍ती जोपासना वाढावी व त्याचा क्रांतिकार्यात उपयोग व्हावा या हेतूने व्यायाम प्रसार करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी इंदूर, देवास, ओंकारेश्‍वर, लोणार, जळगाव, धुळे, उज्जैन, अमरावती, पंढरपूर, इत्यादी ठिकाणांना भेटी दिल्या. विविध क्रांतिकारी संघटनांशी संपर्क करून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला व या संघटनांना शस्त्रे पुरवण्यासाठी मदत केली. बीड येथील ब्रिटिश व रावसाहेब पेशवे यांच्यामधील युद्धात रावसाहेबांना मदत केली.

त्याकाळच्या अनेक प्रसिद्ध पैलवानांना गुरुजींनी कुस्तीमध्ये हरवले. सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या गुरुजींना त्यांच्या मुस्लिम मित्रांनी “भटजी पैलवान’ ही उपाधी दिली. छत्रपती शाहू महाराजांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या शिवाजी क्‍लब या क्रांतिकारी संघटनेला देखील त्यांचे मार्गदर्शन होते. चरितार्थासाठी त्यांनी नंतर अमरावती, पंढरपूर व सातारा येथे व्यायाम शिक्षकाची नोकरी केली. “युद्धयोग’ या अनोख्या लाठी प्रकाराचे ते जनक.

केवलानंद सरस्वती यांच्या सांगण्यावरून गुरुजींनी योगी अरविंद यांना क्रांतिकार्याचे तसेच योगासनांचे धडे दिले. भिडे गुरुजी स्मारक समितीच्या वतीने गुरुजींच्या स्मरणार्थ न्यू इंग्लिश स्कूल, सातारा येथे भिडे गुरुजी व्यायाम मंदिराची स्थापना केलेली आहे.त्यांच्या नावे “भिडेश्री’ हा कुस्तीतील किताब देखील या व्यायाम मंदिरामार्फत दिला जातो. हेलसिंकी येथील ऑलिम्पिक स्पर्धा गाजवणारे पैलवान श्रीरंग जाधव, आंतरराष्ट्रीय कुस्तीचे सामने गाजवणारे बाबुराव काशीद यांना गुरुजींनी कुस्तीचे प्रशिक्षण दिले. अबोलपणे आणि चिकाटीने लोकांत बलोपासना आणि देशभक्‍ती यांचा प्रसार करणाऱ्या निष्ठावंत देशभक्‍तांमध्ये त्यांची गणना प्रामुख्याने करावी लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.