मुंबई- अमेझॉन प्राईम व्हिडीओने त्यांच्या सर्वात लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित सिरीज ‘मिर्झापूर’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून ही सीरीज 23 ऑक्टोबर 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आले होते. उत्तम पटकथा, संवाद आणि विषयाच्या उत्तम मांडणीमुळे प्रेक्षकांनी पहिल्या सिरीजला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच विषयाला पुढे नेणारे ‘मिर्झापूर’चे दुसरे पर्व अधिक रोमांचक आणि उत्तम बनले आहे.
यात पंकज त्रिपाठी, अली फझल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्षिता शेखर गौर, अमित सियाल, अंजुम शर्मा , शिबा चड्डा, मनू ऋषी चड्डा आणि राजेश तेलंग यांसारख्या कलाकारांसोबतचा हा ऍक्शन पॅक प्रेक्षकांना आता ड्रग्स, ऍक्शन आणि जगण्यासाठीचा थरारक लढा याचा अनुभव देणार आहे. ‘मिर्झापुर’च्या दुसऱ्या सिरीजमध्ये विजय वर्मा, प्रियांशु पेंयुली आणि ईशा तलवार दिसणार आहेत.
“एक्सेल एंटरटेनमेंटला उदंड प्रतिसाद आणि प्रेम मिळाले आहे. जेव्हाही आम्ही आपल्या सीमा आणि कक्षा रुंदावून एक उत्तम निर्मिती दिली आहे तेव्हा तेव्हा आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे.” या प्रसंगी रितेश साधवानी, एक्सेल एंटरटेनमेंटचे निर्माते या सीरिजबद्दल बोलताना म्हणाले. “मिर्झापूर हा आमच्या कामाचा पुढचा टप्पा होता.
भारतीय प्रेक्षकांना आम्ही अशा काही कथा दिल्यात ज्या खूप वेगळ्या आणि नवीन होत्या. भारतातील लहान सहान गावांमधून कधीही समोर न येणाऱ्या कथांना लोकांपर्यंत त्याचा अस्सलपणा टिकवून पोहचवणे हे आमच्यासाठी आव्हान होते मात्र आम्ही ते यशस्वीरीत्या पार पाडले. या सीरिजला भारतातच नव्हे जगभरात उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळेच आम्हाला आणखी उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
निर्माते पुनीत कृष्णा म्हणाले कि, “आम्हाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाने आम्हाला खूप आनंद होत आहे. लोकांनी आपली पसंती दर्शवून दुसऱ्या सिरीसबद्दलची उत्कंठा खरंच बघण्यासारखी आहे आणि म्हणूनच आम्हाला आता दुसऱ्या सिझनला सुद्धा त्याच पातळीवर नेऊन ठेवायचे आहे. आम्हाला प्रेक्षकांची उत्कंठा बघून खूप चांगले वाटत आहे.”
या सीरीजचे निर्माते एक्सेल एंटरटेनमेंट असून पुनीत कृष्णा यांनी ही सीरिज बनवली असून गुरमीत सिंग आणि मिहीर देसाई यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षकांची ही आवडती अमेझॉन ओरिजिनल सीरिज अमेझॉन प्राईम व्हिडीओवर २०० पेक्षा जास्त देशात आणि प्रदेशात प्रदर्शित होणार आहे.