मिरजगाव, (प्रतिनिधी)- सध्या उडीद, मूग पिकांना शेंगा लागल्या असून कांदा, तूर, बाजरी जोमात आहे. पण मागील आठ दिवसांपासून परिसरात पावसाने दडी मारली असून प्रचंड ऊन पडत असून नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत.
यंदा मान्सून महाराष्ट्रात वेळेवर दाखल झाला आणि शेतकरी वर्गाने खरिपाची पेरणी सुद्धा वेळेवर केली. पंधरा जूनपासून सातत्याने पावसाची रिमझिम चालू राहिली परंतु काही ठिकाणी कमी-जास्त पाऊस झाला तरीसुद्धा पिके जोमात आली.
मागील वर्षी परिसरात अल्प पाऊस झाल्याने आजही विहीर व बोअरवेलच्या पाण्याची पातळी अत्यंत खालवलेली असल्यामुळे पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असूनसुद्धा पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जर चार ते पाच दिवसांत पाऊस आला नाही तर हाती आलेली पिके पाण्याअभावी करपून जातील, अशी शेतकरी वर्गात भिती आहे.