मेरी कोम आणि साईना नेहवालवरील बोयोपिक सगळ्यांनी बघितला आहे. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूवर बायोपिक बनवला जाणार आहे. हा बायोपिक अर्थातच मणिपुरी भाषेत होणार आहे.
या संदर्भात मीराबाईने इंफाळ पूर्व जिल्ह्यातल्या नॉंनपोक काकचिंग या गावातल्या तिच्या घरी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या देखील केल्या आहेत. सेउती फिल्म प्रॉडक्शन असे हा बायोपिक करणाऱ्या कंपनीचे नाव आहे. या कंपनीचे अध्यक्ष मनाओबी एम एम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
वेटलिफ्टर मीराबाई चानूवर बनणाऱ्या या बायोपिकला इंग्रजी आणि भारतातील वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये डब केले जाणार आहे. मीराबाई चानूची भूमिका पडद्यावर साकारू शकेल अशा अभिनेत्रीचा आम्ही शोध सुरू केला आहे, असे मनाओबी एम एम यांनी सांगितले. ही अभिनेत्री दिसायला मीराबाईसारखीच असायला हवी.
तिला मीराबाईच्या जीवनशैलीचे ट्रेनिंग दिले जाईल. या सिनेमाची सगळी पूर्वतयारी पूर्ण होण्यासाठी आणखीन 6 महिने लागू शकतात. अत्यंत विपरीत परिस्थितीत अहोरात्र कष्ट करून मीराबाईने कशाप्रकारे आपले ट्रेनिंग पूर्ण केले आणि देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून आणले हा सगळा इतिहास या बायोपिकमध्ये दाखवला जाणार आहे.