सांगली : आज पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटनेने सांगली शहर हादरलं आहे. यामध्ये एका 35 वर्षीय व्यक्तीने 15 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले आहेत. संजय माने असे आरोपी नराधमाचे नाव आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
संशयित आरोपी संजय माने 2011 साली प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला 15 वर्षाची शिक्षा लागली आहे. तो सध्या पॅरोल रजेवर आला होता. गेल्या महिन्यात त्याने तू मला आवडतेस असे म्हणत पीडित मुलीचा विनयभंग केला होता. त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. काल 23 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावलं. तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली.
आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर संजयनगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून अटक केली. या प्रकरणी आरोपी संजय माने याच्या विरोधात बी एन एस 65(१) , पोक्सो कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.